(देवरूख /सुरेश सप्रे)
संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते व संगमेश्वर तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य,सुरेश गोविंद जाधव (गुरुजी) यांचे आज बुधवारी दि. ८रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले, ते ८० वर्षांचे होते.
सुरेश जाधव गुरूजींनी निरपेक्ष भावनेने आजपर्यंत जनसामान्य जनतेची सेवा केली. शेवटच्या क्षणापर्यंत ते जनतेची सेवा करत राहिले. एक झुंजार, लढाऊ व सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत झुंज देण्याची ख्याती असलेले एक सुजाण व निर्भीड व्यक्तिमत्व अशी त्यांची सर्वत्र ओळख होती. जनतेचा कैवारी म्हणून ते ओळखले जात होते. सामाजिक व राजकिय क्षेत्रात त्यांनी अनेक पदे भुषवली.
साधी राहणी व उच्च विचारसरणी या तत्वाने ते जगले. ते अत्यंत शांत व प्रेमळ स्वभावाचे होते. या स्वभावाने त्यांनी अनेकांना आपलेसे केले होते. कोणावर अन्याय झाल्यास जाधव गुरूजी त्याला न्याय मिळवून देत असत. अनेकांची शासकिय कामे त्यांनी कसलीही अपेक्षा न बाळगता निरपेक्ष भावनेने मार्गी लावली. तर अनेक सामाजिक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला, उपोषणेदेखील केली आहेत.
ते डाँ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, साखरपा या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, देवळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, देवळे कानडे माध्यमिक विद्यालयाचे माजी चेअरमन, कनकडी महाविद्यालयाचे स्थानिक कमिटीचे अध्यक्ष होते. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर रत्नागिरी येथे उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनाने जनसामान्यांचा नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांचे निधनाबद्दल माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, आम. शेखर निकम, राष्ट्रवादी चे बापू शेट्ये, माजी सभापती सौ. रजनी चिंगळे, जिल्हा प्रमुख विलास चाळके आदींनी शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.