चंदीगड : महान धावपटू ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग (९१) यांचे शुक्रवारी रात्री ११:२४ वा. रुग्णालयात निधन झाले. कोरोनामुक्त झाल्यानंतर मिल्खा घरी परतले होते. ३ जूनला त्यांना पुन्हा पीजीआयमध्ये भरती केले होते. कोरोनावर उपचार सुरू असताना त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचेही १३ जूनला निधन झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आपण एक महान खेळाडू गमावला. काही दिवसांपूर्वीच त्यांच्याशी बोलणे झाले होते. हा शेवटचा संवाद असेल, असे वाटले नव्हते.’ २० नोव्हेंबर १९२९ ला पाकिस्तानाच्या फैसलाबादेत जन्मलेले मिल्खा १९४७ मध्ये दंगलींतून जीव वाचवून भारतात आले. यानंतर ते १९६० मध्ये पहिल्यांदा पाकला गेले. तेथे त्यांना ‘फ्लाइंग सिख’ची उपाधी देण्यात आली होती.