(आरोग्य)
फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू होतात. त्यामुळे फेब्रुवारी-मार्च महिन्यादरम्यान विद्यार्थ्यांबरोबरच पालकांमध्येसुध्दा तणावाचे वातावरण असते. हा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी विद्यार्थांच्या दिनक्रमात बदल न करता, वेळेचे नियोजन करून, थोडा वेळ योगाभ्यासासाठी देणं आवश्यक आहे. योग केल्यामुळे परीक्षेच्या ताण तणावांना सामोरे जाण्याचे मनोबल विद्यार्थ्यांना प्राप्त होते. तसेच स्मरणशक्ती व आत्मविश्वास वाढविण्यासाठी योग आवश्यक आहे. योगासनाबरोबरच प्राणायाम, ध्यान केल्याने मनाची एकाग्रता वाढते. मन शांत, तणावरहित, चिंतामुक्त होण्यास मदत होते. काही योगासने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी मदत करतील अशी आहेत.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासाठी एकाग्रता अत्यंत महत्त्वाची असते. योगासनांमुळे विद्यार्थ्यांची शारीरिक वाढ योग्यपद्धतीने होते. आपण यासाठी भुजंगासनाचे उदाहरण घेऊया. भुंजगासन खांदे आणि मानेचे स्नायू मोकळे करते. पोटाच्या स्नायूंना यामुळे मजबूती मिळते. पाठ आणि खांदे मजबूत होतात. पाठीच्या वरच्या आणि मधील भागामध्ये रक्तसंचार सुधारुन त्यांना लवचिकता मिळते. तसेच तेथील तणाव आणि थकवा कमी होतो. विद्यार्थ्यांच्या पाठीवर असलेल्या दफ्तरामुळे अनेकवेळा पाठदुखीची तक्रार येते. अशावेळी नियमीत भुजंगासन जर विद्यार्थी करीत असतील, तर ही तक्रार नक्कीच दूर होण्यासाठी मदत होते.
मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासामध्ये योगाची महत्वपूर्ण भूमिका आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक आसने लाभदायक आहेत. यामध्ये सूर्यनमस्कार, दंडासन, भुजंगासन, पर्वतासन, ताडासन, धनुरासन, वृक्षासन, मर्जरी आसन, वज्रासन, वीरभद्रासन आणि शिशुआसन या योगासनांसह आणखीही काही आसनांचा समावेश होऊ शकतो.
विद्यार्थांसाठी लाभदायक योगासने
सूर्यनमस्कार
सूर्यनमस्कार घातल्यामुळे स्नायूंना व्यायाम मिळतो, शरीर योग्य प्रमाणात ताणले जाते, शरीराची लवचिकता वाढते आणि हृदयाचे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. तसेच मेंदूत डाव्या आणि उजव्या बाजूला संतुलनाची भावना निर्माण होते. सूर्यनमस्काराने चिंता, ताण तणाव आणि मनःस्थितीत बदल कमी होऊन एकाग्रता वाढते.
ताडासन
या आसनाचा सराव तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात. पण अन्नपदार्थ खाल्यानंतर करू नये. ताडासन करताना मणक्याचा पूर्ण भाग ताणला जातो आणि सैल सोडला जातो. या आसनामुळे शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यास मदत होते.
पर्वतासन
या आसनामुळे पायाच्या स्नायुंमध्ये, गुडघ्याच्या मागील स्नायुंमध्ये तसेच पाठीतील स्नायुंमध्ये ताण निर्माण होतो. यामुळे थकवा कमी होऊन विद्यार्थांमधील स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते.
अनुलोम विलोम
अनुलोम विलोम प्राणायामाच्या सरावामुळे नाड्या शुध्द होण्यास मदत होते. शरीरात आलेला थकवा, आळस कमी होतो. या प्राणायामाच्या सरावामुळे विद्यार्थांमधील ताण तणाव कमी होऊन एकाग्रता वाढते.
ध्यान
विद्यार्थांनी दररोज किमान ५ ते १० मिनटे ध्यान करावे. ध्यानामुळे विद्यार्थांमध्ये परीक्षेसंबंधी असलेली भीती कमी होऊन भावनात्मक स्थिरता वाढेल. तसेच एकाग्रता वाढल्यामुळे मन कुशाग्र होते.