(मुंबई)
मुंबईतील बिग बूल गुंतवणूकदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून मुंबईतील उच्चभ्रू वरळी भागात १२०० कोटी रुपयांना प्राॅपर्टीची खरेदी केली आहे. बिल्डरवर कर्जाची परतफेड कऱण्याचा दबाव असल्याने त्यानेही सदनिका सवलतीच्या दरात विकल्या आहेत. त्यामुळे या व्यावसायिकाला चांगलाच फायदा झाला आहे.
मुंबईच्या वरळी भागात डिमार्ट चेनचे संस्थापक अध्यक्ष राधाकृष्ण दमानी, त्यांचे कुटूंबिय आणि सहकाऱ्यांनी मुंबईच्या उच्चभ्रू वरळी भागात १ हजार २३७ कोटी रुपयांमध्ये २८ निवासी यूनिट्सची खरेदी केली आहे. दमानी यांनी देशाच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वात मोठा सौदा केला आहे. या करारातील विक्रेता सुधाकर शेट्टी नामक बिल्डर आहे.
उपलब्ध माहितीनुसार, हा करार चांगलाच चर्चेत आला आहे. कारण नुकत्याच झालेल्या बजेट २०२३ मधील घोषणेमुळे १ एप्रिलपासून उच्च लक्झरी प्राॅपर्टींवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यात गृहनिर्माण मालमत्तेसह दीर्घकालीन मालमत्तेच्या विक्रीतून भांडवली नफ्याच्या पुनर्गुंतवणुकीवर अर्थसंकल्पात १० कोटी रुपयांची मर्यादा घालण्यात आली आहे. सध्या अशी कोणतीही मर्यादा लागू नाही.
दमानी यांनी खरेदी केलेल्या मालमत्तांचे एकूण चटईक्षेत्र १,८२,०८४ चौरस फूट आहे. ज्यामध्ये १०१ कार पार्किंगचा समावेश आहे. खरेदीदारांनी टॉवर बी ऑफ थ्री सिक्स्टी वेस्ट, ॲनी बेझंट रोड, वरळी येथे अपार्टमेंट खरेदी केले आहेत. यापैकी बहुतेक अपार्टमेंटचे कार्पेट क्षेत्र ५ हजार चौरस फूट आहे आणि त्यांची किंमत सरासरी ४० ते ५० कोटी रुपये आहे.