(मुंबई)
मुंबई महापालिकेकडून शनिवारी अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. कोरोना संकट आणि त्यापाठोपाठ गोवर तसेच इतर संसर्गजन्य आजारांशी मुंबई महापालिका प्रशासन खंबीरपणे लढा देत असताना सन २०२३ २४ च्या अर्थसंकल्पात आरोग्यविषयक तरतूदींमध्ये किमान १५ टक्के वाढ होणे अपेक्षित होते, परंतु गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ३०० कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे. सन २०२२-२३ मध्ये आरोग्यविषयक बाबींसाठी अर्थसंकल्पात ६६२४.४१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, परंतु यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्यविषयक निधीला कात्री लावत ६३०९.३८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत त्यात ९ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या एकूण अर्थसंकल्पापैकी १२ टक्के निधी आरोग्यविषयक बाबींसाठी देण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने २०२२-२३ च्या सुधारित अर्थसंकल्पात वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यासाठी १२८७.४१ कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय अंदाजमध्ये १६८०.१९ कोटी इतकी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच ३९२.७८ कोटी रुपये इतकी प्रस्तावित वाढ करण्यात आली आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात मेट्रोपॉलिटीन सर्व्हिलन्स युनिटची स्थापना, परवडणाऱ्या दरांत अत्याधुनिक चाचण्या उपलब्ध करून देण्याकरिता रुग्णालयात प्रतिनग १५ कोटी इतक्या अंदाजित खर्चाची प्रत्येकी एक सी.टी. स्कॅन मशीन खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याबरोबरच, के. ई. एम., नायर व शीव रुग्णालयात प्रतिनग २५ कोटी इतक्या अंदाजित खर्चाची प्रत्येकी एक ३ टेस्ला एम. आर. आय. यंत्रणा उभी होणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेसाठी २०२२- २३ च्या सुधारीत अर्थसंकल्पामध्ये ७५ कोटींची तरतूद आहे.