(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा कळझोंडी नं.१ या शाळेचा अमृत महोत्सवपूर्ती सोहळा शाळा सुधार कमिटीचे विद्यमान अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते व गावचे धडाडीचे उपसरपंच प्रकाश रामचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. विशेष म्हणजे कळझोंडी शाळेला विनामोबदला जमीन देणारे दानशूर व्यक्तिमत्व कै. पर्शुराम विष्णू ढापरे यांच्या स्मरणार्थ ढापरे कुटुंबियांकडून १० गुंठे जागा बक्षीसपत्राने दिल्याबद्दल ढापरे कुटुंबियांचे प्रमुख श्री.प्रदीप पांडुरंग ढापरे यांच्या हस्ते कै. पर्शुराम विष्णू ढापरे नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी ढापरे कुटुंबियांचे ग्रामस्थांच्या वतीने भेटवस्तू, गुलाबपुष्प व गौरवपत्र देऊन ढापरे कुटुंबीयांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांची पूजन करण्यात आले.तसेच शाळेच्या अमृत महोत्सवपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून सर्व महिला ग्रामस्थांच्यावतीने ७५ पणत्या उजळवून शाळेचे पूजन करण्यात आले.यावेळी गावातील वयोवृद्ध मातांना साडी व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून दानशूर देणगीदार व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्द या शैक्षणिक वर्षात विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवण्याचा संकल्प शाळा व्यवस्थापन समिती व अमृत महोत्सवपूर्ती सोहळा सुधार कमिटीने शाळेतर्फे हाती घेतला आहे. यामध्ये नामांकित डॉक्टरांकडून नेत्रचिकित्सा शिबीर, विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण, महिला मिळावे,माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा, बाल आनंद मिळावा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळा सुधार कमिटीचे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून यावेळी व्यक्त केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुंदरवाडी, बौद्धवाडी, तिखवटवाडी, आग्रेवाडी, शिंदेवाडी, कुंभवणेवाडी, ब्राह्मणवाडी या वाडीतील ग्रामस्थ यांनी मोठे योगदान दिले. श्रमदान केलेल्या ग्रामस्थ,शिक्षणप्रेमी, वाडी प्रमुखांना शाळा व ग्रामस्थांतर्फे धन्यवाद देण्यात आले. सायंकाळी शालेय विद्यार्थ्यांची विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून उद्योजक किरण सामंत ,जेष्ठ सामाजिक युयुत्सु आर्ते, कवी अरुण मोर्ये, पत्रकार संतोष पवार यांनी भेटी दिल्याने त्यांचे शाळेतर्फे स्वागत करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमानंतर उद्योजक अवधूत मुळ्ये, चित्तरंजन मुळ्ये यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेटवस्तू देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.या कार्यक्रमाला सर्व वाडीप्रमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय शितप, शाळा सुधार कमिटीचे धडाडीचे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार यांसह गावचे सरपंच सौ. दिप्ती वीर, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.मेघना पाष्टे, जमीन देणगीदार ढापरे कुटुंबीय, प्रदीप ढापरे सौ. प्रिया ढापरे, आशा प्रभूघाटे, केंद्रप्रमुख सौ. मांजरेकर, केंद्रप्रमुख अनिल पवार, मुख्याध्यापक राजकुमार जाधव, गावचे प्रतिष्ठित नागरिक पांडुरंग मुळ्ये, श्रीराम तथा आनंद मुळ्ये, विलास मुळ्ये, चित्तरंजन मुळ्ये, मदन मुळ्ये,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय शितप, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुहानी शिंदे, किशोर पवार, संजय पवार, सामाजिक कार्यकर्ते व देणगीदार एकनाथ शिंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील उपशिक्षिका चित्रा ठाकूर, प्रास्ताविक मुख्याध्यापक राजकुमार जाधव तर आभार किशोर पवार यांनी मानले.