(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरातून मजगाव, शिळ गावात जाणा-या सिटी बसेसच्या तिकिटांमध्ये वाढ करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आला होता. परंतु एस टी प्रशासनाच्या या निर्णयाला प्रवाशांनी मोठा विरोध केला होता. प्रवाशांच्या तक्रारीवरून मजगाव सरपंच फैय्याज मुकादम यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेऊन तिकीट दरवाढीसंदर्भात चर्चा केली. यामुळे तिकीट दरवाढ संदर्भातील निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आला असून मजगाव, शिळ गावातील लोकांना दिलासा मिळाला आहे.
रत्नागिरी शहरातून मजगांव मार्गे जाणाऱ्या सर्व गाड्यांचे दिनांक 1 फेब्रुवारी पासून तिकीट दरवाढीचा मेसेज अनेक व्हॉट्सअप ग्रुपला फिरत होता. याबाबत काहींनी तोंडी तक्रारी केल्या होत्या. या तिकीट दरवाढीसंदर्भात फैय्याज मुकादम यांनी उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे स्विय सहाय्यक नेताजी पाटील यांच्या कानावर ही गोष्ट घातली व एस.टी. विभागाचे जाधव यांच्यापर्यंत हा विषय पोहचवला. त्यानंतर तात्काळ दुस-या दिवशी फैय्याज मुकादम यांनी या दरवाढी संदर्भात एस.टी. अधिकाऱ्यांची भेट घेतली.
यावेळी भाडेवाढ करण्यामागचा हेतू विचारला असता गद्रे कंपनीकडून रस्ता झाल्याने 1 स्टेज वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे एस टी प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र यामध्ये प्रवाशांची काय चूक? ही प्रशासकीय बाब असल्याचे निदर्शनात आणून दिले गेले. यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत या भागातील सर्व सरपंचांसोबत एक बैठक बोलवली. त्यामध्ये भाडेवाढ करण्याबाबत निर्णय स्थगित ठेवण्यात यावा असे मत मांडण्यात आले.
दरम्यान सध्या तिकीट दर पूर्वीप्रमाणे आकारण्यात आला आहे. मजगांव, शीळ तिकीट दर पूर्वीप्रमाणे 20 रुपये आकाराला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.