( रत्नागिरी / प्रतिनिधी )
सॅनिटरी पॅड व डिटर्जंट पावडर बनवून देण्याचा घरबसल्या रोजगार मिळवून देतो असे सांगत जिल्ह्यातील १५१ महिलांकडून सभासद फी व कच्चा माल देण्यासाठी ७२ हजार ६०१ रुपयांची रक्कम घेऊन फसवणूक केल्याची तक्रार महिलांनी केली आहे. यानुसार गुहागर पोलिस ठाण्यात जळगाव येथील संदीप शरद मुळे (पाटील) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत गुहागर पोलिस ठाण्यात महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून २०२२ रोजी गरज नावाने संदीप शरद मुळे याने व्हॉट्सअप ग्रुप तयार केला व जिल्ह्यातील महिलांच्या संपर्कात राहून सॅनिटरी पॅड व डिटर्जंट पावडर घरबसल्या बनवून महिलांना रोजगार संधी मिळवून देतो असे सांगितले. तसेच तालुका पातळीवर कमिटी नेमण्यास सांगितले व या कमिटीच्या माध्यमातून तेथील महिलांची सभासद फी व इतर रोख रक्कम स्वतःच्या जळगाव येथील बँक खात्यात टाकण्यास सांगितले. सुरुवातीचे काही महिने लवकरच कच्चा माल पाठवून देतो असे सांगत चालढकल केली. काही महिलांनी याबाबत ग्रुपवर आवाज उठवला असता संदीप मुळे (पाटील) याने धमकीही दिली. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलांनी गुहागर पोलिस ठाण्यात धाव घेतली. १५१ महिलांकडून सभासद फी ३५१ रुपयांप्रमाणे ५३,००१ रूपये तसेच कच्चामाल व मशीन यासाठी १९,६०० रुपये अशी एकूण ७२ हजार ६०१ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलिस करीत आहेत.