(रत्नागिरी)
येत्या ११ व १२ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीमध्ये राज्यस्तरीय काजू परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर ऊहापोह होणार आहे. गेली ५ वर्ष काजू प्रक्रिया धारक संघ, जिल्हा आणि महाराष्ट्र काजू संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आजारी काजू उद्योगाला उभारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. २०१७ मध्ये ना. दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अभ्यास अहवाल सादर केला आहे.
काजू कारखानदारांच्या थकीत कर्जाचे पुनर्गठन व्हावे, केसरकर समितीच्या अहवालाची अमलबजावणी व्हावी, पिक कर्ज माफ व्हावे, नवीन उद्योजकाना बँकेच्या जाचक अटीमधून मुक्तता मिळावी, पणन आणि कृषीच्या माध्यमातून काजू बी चे संकलन व्हावे, अशा विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. याचाच एक भाग म्हणून राज्यस्तरीय काजू परिषदेत लागवड, नियोजन, अर्थकारण, बाजारभाव, तसेच काजू उद्योजकांकारिता अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे व्यवस्थापन, अर्थकारण, काजू बी संकलन, बाजारभाव, समस्या यावर मार्गदर्शन आणि चर्चेचे नियोजन करण्यात आले आहे.
काजू क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान यावेळी केला जाणार आहे. या परिषदेला राज्यातून अनेक शेतकरी, काजू व्यावसायिक, काजू व्यापारी, कारखानदार उपस्थित राहणार आहेत.