(मुंबई)
देशविरोधी कट रचल्याचा आरोप असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवरील कारवाईप्रकरणी महाराष्ट्र एटीएसकडून मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एटीएसने या प्रकरणात २१ जणांना अटक केली आहे. यामध्ये पाच जणांना मुंबईतून अटक झाली होती. इतर आरोपींना पनवेल, भिवंडी, मालाड, कांदिवली आणि कुर्ला परिसरातून अटक करण्यात आली होती. या आधी पीएफआयवर नाशिक युनिटनेही गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र एटीएसने पीएफआयवर यूएपीए अंतर्गत देशाविरोधी कारवाया आणि आयपीसी कलम १२० बी, १२१-ए, १५३-ए आणि यूएपीए कायदा १३ (१) या कलमांखाली आरोप लावले आहेत. यात महाराष्ट्र एटीएसच्या मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि नांदेड युनिटने एकूण ४ एफआयआर नोंदवले आहेत. एटीएसच्या मुंबई युनिटतर्फे आज या प्रकरणात आपले पहिले आरोपपत्र दाखल केले आहे.
गेल्या वर्षीसप्टेंबर महिन्यांपासून देशभरात छापेमारी सुरु झाल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटना चर्चेत आली. नाशिक जिल्ह्यातून अनेकांना एटीएसने ताब्यात घेतले होते. यातील काही संशयितांना न्यायालयात हजर केले असता धक्कादायक खुलासे समोर आले होते. त्यानंतर नाशिकमधून पुन्हा एका पदाधिका-याला एटीएसने ताब्यात घेतले होते. त्यामुळे पीएफआयची पाळेमुळे नाशिकमध्ये खोलवर रुजल्याचे दिसून येत आहे.