(संगमेश्वर / प्रतिनिधी)
कुणबी सेवा संघ दापोली संचलित नवभारत छात्रालय दापोली परिवारांतर्गत सूक्ष्म सिंचन प्रशिक्षण नुकतेच छात्रालयात संपन्न झाले. प्रशिक्षण कार्याचा शुभारंभ रजिमस. बॅंक शाखा दापोलीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गुरव यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रशिक्षण शिबीराचे प्रास्ताविक करताना कुणबी सेवा संघ दापोलीचे अध्यक्ष व प्रशिक्षणाचे मुख्य प्रशिक्षक प्राध्यापक प्रभाकर शिंदे यांनी केले. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून घेण्यासाठी हे प्रशिक्षण खूप गरजेचे आहे. या प्रशिक्षणात मिळणाऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग तुम्ही स्वतः करुन आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करु शकाल. त्यासाठी वेळोवेळी आमच्याकडून मार्गदर्शन मिळेल. या तंत्रज्ञानामुळे पाण्याची बचत होते. त्यामुळे पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ करता येवू शकते.
यावेळी बोलताना प्रमुख अतिथी सुनील गुरव म्हणाले की, या प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अनेक अडचणी सोडवता येणार आहेत. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करुन आपल्या शेतीत त्याचा वापर करावा असे आवाहन गुरव यांनी केले. बॅंकेकडून शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांबाबत गुरव यांनी यावेळी माहिती दिली.
प्रशिक्षण कालावधी मध्ये मुख्य प्रशिक्षक प्रा. प्रभाकर शिंदे यांनी शेतकऱ्यांना एलसीडी प्रोजेक्टर द्वारे सूक्ष्म सिंचनाचे फायदे तोटे, वर्गीकरण तुलना, सूक्ष्म तुषार संचाचे घटक, ठिबक सिंचनाखाली पिकांचे उत्पादन कमी होण्याची कारणे, ठिबक संचाची जोडणी आणि उभारणी, खत सिंचन पध्दती, पारंपरिक पाणी लावण्याच्या पध्दती आदि विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षणामध्ये रवींद्र गोरिवले यांनी प्रात्यक्षिकामध्ये ठिबक सिंचनासाठी आवश्यक साहित्य ओळख पीव्हीसी, जीआय, पाइप जोडणी, टेकऑफ जोडणी, ड्रीपर जेटस, मायक्रो स्प्रिंकलर आदि जोडणी बाबत सखोल माहिती दिली . यावेळी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र आणि ठिबक सिंचन माहिती पुस्तकाचे वितरण करण्यात आले .
प्रशिक्षणाच्या समारोपाप्रसंगी प्रमुख अतिथी ओंकार खरे यांनी बोलताना सांगितले की, आज मी उद्योजक आहे तो या संस्थेमुळे. या संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणांमुळे मला जैन कंपनीची डीलरशिप मिळाली. शासनामार्फत ठिबक सिंचनासाठीदेण्यात येणाऱ्या सबसिडीचा फॉर्म भरण्यापासून ते सबसिडी मिळेपर्यंतची सविस्तर माहिती त्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिली. प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ . प्रमोद सावंत यांनी पाणी आणि पाण्याचा वापर काटकसरीने करावा हा अत्यंत महत्वाचा विषय आहे असे नमूद केले. तंत्रज्ञानाचे बारकावे व्यवस्थित समजून घ्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटन आणि समारोपाप्रसंगी संस्थेचे सचिव हरिश्चंद्र कोकमकर, सहसचिव राजेंद्र शिंदे, तंत्रप्रशिक्षक रवींद्र गोरिवले आदि मान्यवर उपस्थित होते. हे प्रशिक्षण यशस्वी करण्याकरिता वर्षा गोरिवले, किर्ती घाग, सुजित गोलांबडे, प्रियांका साखरकर, रेणूका शिंदे, अक्षता गोरिवले, विद्या पड्याळ यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रशिक्षणासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे प्रा. प्रभाकर शिंदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रशांत मांडवकर यांनी केले.