(चिपळूण)
मुंबई गोवा महामार्गावरील सावर्डे या ठिकाणी आज ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आंदोलन केलं. मुंबई गोवा महामार्गाचे चौपद्रीकरणाचे धोकादायक काम ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी बंद पाडलं. शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे शिवसैनिकांनी आंदोलन केलं होतं. महामार्गाचे काम चालू झाल्यापासून आतापर्यंत अनेक समस्या या महामार्गावर निर्माण झाल्या होत्या, त्या विरोधात शिवसैनिक आज एकत्र येत हे आंदोलन केलं.
महामार्ग उभारताना गटारांचं नियोजन नाही, विद्युत वाहिन्यांचे नियोजन नाही, याबरोबरच चालू महामार्गावर ठेकेदारांच्या कामात वापरण्यात येणारे अवजारे क्रेन इतर मशीनरी यासह पूल( ब्रीज ) उभारणी करिता तयार करण्यात येणारे साहित्य हे देखील महामार्गावरच ठेवल्यामुळे ठाकरे शिवसैनिक आक्रमक झाले होते. या सर्व विरोधात ठाकरे गटाने भूमिका मांडत रस्ता रोकोचा इशारा देखील प्रशासनाला दिला होता. मात्र प्रशासनाच्या यशस्वी मध्यस्थी नंतर रास्ता रोको करण्यात आला नव्हता.
येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये संबंधित सर्व अडचणी आणि प्रश्न निकाली आले नाही तर आंदोलन अधिक प्रखर करण्याचा इशारा ठाकरे गट शिवसैनिकांनी प्रशासनाला दिला आहे.