(मुंबई)
पाच वर्षापासून रखडलेली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची घोषणा झाली आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. २२ फेब्रुवारी २०२३ ते तीन मार्च २०२३ या दरम्यान ऑनलाईन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे. उमेदवारांना ८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
मागील पाच वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरतीसाठी आवश्यक शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी केव्हा होणार? असा प्रश्न डीएड आणि बीएड उमेदवारांकडून सातत्याने विचारला जात होता. अखेर त्याची प्रतीक्षा संपली असून राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षांच्या तारखांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. येत्या २२ फेब्रुवारी २०२३ ते ३ मार्च २०२३ दरम्यान ऑनलाईन अभियोग्यता चाचणी परीक्षा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख आठ फेब्रुवारी अशी आहे.
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये शिक्षकांची भरती करण्यासाठी पवित्र पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या संगणकीय प्रणालीद्वारे भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने २०१७ मध्ये घेतला होता. त्यानुसार डिसेंबर २०१७ मध्ये टीएआयटी परीक्षा महापरीक्षा पोर्टलच्यावतीने ऑनलाइन घेण्यात आली होती. त्यानंतर अजून पाच वर्षे उलटली तरी परीक्षा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील तीन लाखाहून अधिक डीएड-बीएड धारक आणि ५४ हजार पात्र शिक्षक या अभियोग्यता चाचणीसाठी प्रतिक्षेत आहेत. मात्र परिषदेकडून वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता त्यांची प्रतीक्षा संपल्याची प्रतिक्रिया ते व्यक्त करीत आहेत.
वेळापत्रक
-ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी – ३१ जानेवारी २०२३ ते ८ फेब्रुवारी २०२३
– परीक्षा शुल्क भरण्यासाठी कालावधी – ८ फेब्रुवारी २०२३ रात्री ११.५९ पर्यंत
– प्रवेशपत्र ऑनलाईन मिळण्याचा कालावधी- १५ फेब्रुवारीपासून २०२३ पासून
– ऑनलाईन परीक्षा तारखा – २२ फेब्रुवारीपासून ते ३ मार्चपर्यंत ( उमेदवार संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधानुसार बदल होण्याची शक्यता आहे.)