(बीड)
गेवराईमध्ये सुरु असलेल्या कृषी प्रदर्शनात सध्या एक कोटीच्या गजेंद्र रेड्याची चर्चा सुरु आहे. हा रेडा या प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये शेती अवजाराबरोबरच पशुप्रदर्शनदेखील भरवण्यात आले आहे. शेतीला आधुनिकतेची जोड मिळावी, यासाठी या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कधी अवकाळी तर कधी अतीवृष्टीचे संकट बळीराजाला सतावते, पण या अडचणींवरही कशी मात करता येवू शकते, याबाबतची माहिती सांगणारे हे प्रदर्शन आहे. पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिकतेची जोड धरुन जर शेतक-यांनी काळी माती योग्य प्रकारे कसली तर नक्कीच भरघोस पीक हाती येईल, असे तज्ज्ञांचं म्हणणे आहे. आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे हेच महत्त्व पटवून देण्यासाठी या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात गजेंद्र रेड्याची चर्चा आहे. फक्त हा रेडा पाहण्यासाठीदेखील मोठी गर्दी होत आहे.
गेवराईत सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनात शेतक-यांचा मोठा सहभाग आहे. नवनवीन तंत्रज्ञानासह शेती अवजारांची माहिती दिली जात आहे. बीडच्या गेवराईमध्ये किसान कृषी प्रतिष्ठानच्या वतीने चार दिवसीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या १५ वर्षापासून किसान कृषी प्रतिष्ठानच्यावतीने हे कृषी प्रदर्शन भरवले जात आहे. यामध्ये शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि शासकीय योजनेची माहिती शेतक-यांना दिली जाते. त्यामुळे या कृषी प्रदर्शनात बीड जिल्ह्यातूनच नाही तर महाराष्ट्रातून अनेक शेतकरी शेतीतील नवनवीन प्रयोग बघण्यासाठी सहभागी होतात. यावर्षीही शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.