(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यातील बेरोजगार तरूण तरूणींसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आह़े. हा मेळावा 12 फेब्रुवारी 2023 रोजी शहरातील शिर्के हायस्कूल येथे होणार आहे. सुमारे 2 हजार मुलांना थेट रोजगार या मेळाव्यात नोकरी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
सोमवार 30 जानेवारी रोजी शहरातील विवेक हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री सामंत बोलत होत़े. उद्योग मंत्रालय व पुणे येथील युवा हक्क या संस्थेच्या माध्यमातून राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आह़े. या मेळाव्यात 5 वीच्या पुढे शिक्षण घेतलेले तरूण – तरूणी या मेळाव्यात सहभागी होऊ शकतील. सुमारे 172 कंपन्यांनी रोजगार मेळाव्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुलांची जागेवरच निवड होऊन त्यांना तातडीने नियुक्ती पत्र हाती देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्याच्या खासगी क्षेत्रात मोठ्या संख्येने रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत़, मात्र कोकणातील तरूणांनी आपल्या मानसिकतेमध्ये बदल करणे आवश्यक आहे. घराशेजारीच नोकरी मिळेल अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाह़ी. चांगल्या रोजगारासाठी घर सोडण्याची तयारी तरूणांनी दाखवायला हव़ी. टाटा, महिंद्रा सारख्या मोठमोठ्या कंपन्यामध्ये रोजगाराच्या सुवर्णसंधी मुलांना उपलब्ध आहेत़. या संधीचा आपण लाभ घेतला पाहिजे असे सामंत यांनी यावेळी सांगितले.
युवा हक्क संस्थेचे किरण रहाणे यांनी सांगितले की, टेक्निकल, नॉनटेक्निकल, हॉस्पिटॅलिटी व अन्य प्रकारचे जॉब या मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत़. यासाठी 11 फेबुवारी पर्यंत आपली नोंदणी उमेदवारांनी करावयाची आह़े. फॉर्म ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ऑफलाईन फॉर्म मंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयात उपलब्ध होतील, असे किरण रहाणे यांनी यावेळी सांगितले.