(रत्नागिरी)
तालुक्यातील मालगुंड-मराठवाडी येथील चंडिका देवी मंदिरातील दानपेटी फोडून ९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या चोरट्याला जयगड पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तुषार सुभाष पाटील (वय ३५, भाटलेवाडी-मालगुंड, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवार २३ जानेवारी ते २९ जानेवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडी मालगुंड येथे चंडिका देवी मंदिरातील दानपेटीतील ९ हजार २०० रुपयांची नाणी व नोटा पळविल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मंदिर अध्यक्ष जितेंद्र जयवंत साळवी (वय ४९, मराठवाडी वरचा वठार मालगुंड) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी तुषार पाटील याला रविवार 29 जानेवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास अटक केली. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.