(नवी दिल्ली)
१७.१ षटकांत संपूर्ण इंग्लंडचा संघ ६८ धावांवर बाद झाला. भारतीय संघाकडून तीतस साधूने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत ४ षटकांत केवळ ६ धावा देत दोन गडी बाद केले. तर अर्चना देवी, पार्शवी चोप्रा यांनीही प्रत्येकी दोन मन्नत कश्यप, शेफाली वर्मा आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.
इंग्लंडकडून रॅना हिने सर्वाधिक १९ धावा केल्या. १२० चेंडूंत ६९ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय महिलांनी वेगवान खेळी सुरू केली. १ चौकार आणि १ षटकार ठोकून कर्णधार शेफाली १५ धावांवर तंबूत परतली. श्वेताही ५ धावा करून बाद झाली, पण नंतर सौम्या तिवारी आणि गोगंदी त्रिशा यांनी एक चांगली भागीदारी करत भारताचा विजय पक्का केला. त्रिशा २४ धावा करून बाद झाली, पण तोवर भारत विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. सौम्याच्या नाबाद २४ धावांच्या जोरावर भारताने १४ षटकांत ६९ धावा करत सामना आणि विश्वचषक जिंकला. तीतस साधूला सामनावीर, तर इंग्लंडची कर्णधार ग्रेस स्क्रिव्हेन्सला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
बीसीसीआयकडून ५ कोटींचे बक्षीस
या पहिल्यावहिल्या विजयासाठी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी भारतीय महिला संघासाठी ५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. त्यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली. सोबतच शहा यांनी खेळाडूंना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजयाचा जल्लोष करण्यासाठी निमंत्रण दिले आहे.
भारताच्या अंडर १९ महिला संघाने रविवारी – ऐतिहासिक कामगिरी करत क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पार पडलेल्या अंडर १९ महिला टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर ७ गडी राखत हा विजय मिळवला. भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर आधी गोलंदाजी निवडून इंग्लंड संघाला अवघ्या ६८ धावांत गुंडाळले.