(देवरुख / सुरेश सप्रे)
“हर घर नल से जल” या योजनेचा संगमेश्वर तालुक्यातील अनेक गावातून बोजवारा उडाल्याच्या तक्रारी असूनही ग्रामीण पुरवठा विभाग मात्र ढींम्म असल्याने जनतेला हक्काचे जल मिळत नसलेने स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाविरूध्द जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यातील मार्लेश्वर मार्गावरील हातीव गावात जलजीवन योजनेतून पाणी योजना मंजूर झाली आहे. यातील विहीर व टाकीसाठीचे बक्षिसपत्र झालेले नसताना या योजनेचे कामकाज सुरु कसे करण्यात आले असा प्रश्न हातिवचे माजी सरपंच विलास गोंधळी यांनी गटविकास अधिकारी देवरूख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे.
नवीन योजनेचे अंदाजपत्रक तयार झाले, त्याला मंजूरी नसतानाही विहीर व टाकीचे बांधकाम प्रत्यक्षात सुरु झाले आहे. या योजनेच्या मंजूरीबाबत माहिती ग्राप. ने गावात कोणालाही दिलेली नाही. ग्रामसभेसमोर या योजनेबाबत मंजूरी पत्र न दाखवता विद्यमान सरपंच यांनी काम तुर्तास योजनेचे बंद करुन प्रभागवार सभा घेवून योजना गावासमोर ठेवून अंतिम निर्णय घेतला जाईल असे नमूद केले. मात्र मंजूरी पत्र दाखवलेले नाही व प्रभागवार सभाही अद्याप घेण्यात आलेल्या नाहीत. विहीर व टाकीसाठी जागेचे बक्षीसपत्र केलेले नाही. तरीही काम कसे सुरु झाले, याचा खुलासा ग्रामसभेत सरपंचांनी केलेला नाही.
यापूर्वीही गावातील पाणीयोजनेतील विहीरीसाठी बक्षिसपत्र नसल्याने ती योजना जागेमालकाने रखडवून पाणी बंद केले होते. याचीच पुर्नरावृत्ती यावेळीही होवू नये. अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच अधिकारी वर्गाला हाताशी धरून काम करून सत्ताधाऱ्यांनी आपले उखळ पांढरे करून जनतेला वेठीस धरू नये, अशी अपेक्षा व्यक्त करत मागील बंद असलेल्या व या वेळच्या योजनेची तरी बक्षिसपत्रे करून पाणी योजनेची कामे नियमानुसार व गावातील जनतेला विश्वासात घेवून करावीत अशी मागणी केली आहे.
बक्षिसपत्र नसताना कामाची वर्क ऑर्डर निघाली कशी? अशी विचारणा गोंधळी यांनी केली आहे. या निवेदनाची दखल घेवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करणेत आली आहे.
यावर काही लोकप्रतिनिधींना हाताशी धरून नियमबाह्य कामे करून जनतेला पाण्यापासून वंचित ठेवणार्यासंबधित अधिकारी वर्गावर कारवाई करून अशा बेकायदेशीर कामांची चौकशी होईल का? की नेहमी प्रमाणे चौकशीचा फार्स करून सर्व आलबेल आहे, असे दाखवले जाईल की कडक कारवाई केली जाईल का! याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.