(नवी दिल्ली)
देशातील वाहननिर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या टाटा मोटर्सने प्रवासी वाहनांच्या किंमतीत 1.2 टक्के वाढ करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. येत्या 1 फेब्रुवारीपासून प्रवासी वाहनांच्या प्रकार आणि श्रेणीनुसार किंमतवाढ होणार आहे. वाहननिर्मितीसाठी येणाऱ्या खर्चात वाढ आणि बीएस ६ च्या नियामक बदलांमुळे एकूण खर्चात वाढ झाल्याने वाहनांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
निर्मितीच्या विविध टप्प्यांवर वाढलेला सामग्री खर्च पाहता किंमती वाढविणे भाग ठरले. मात्र ग्राहकांवर कमीत कमी भार पडावा असे प्रयत्न केले गेले आहेत, असेही कंपनीकडून सांगण्यात आले. कंपनी देशांतर्गत बाजारात नेक्सॉन, हॅरियर, सफारी आणि पंच यांसारख्या विविध वाहनांची विक्री करते. शुक्रवारच्या सत्रात भांडवलाची बाजारात सर्वत्र मंदीवाल्यांचा पगडा राहून देखील टाटा मोटर्सच्या समभागाने चमकदार कामगिरी केली. टाटा मोटर्सचा समभाग शुक्रवारच्या सत्रात 6.34 टक्क्यांनी वधारून 445.55 पातळीवर बंद झाला.