(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रात समुद्रात रविवारी २९ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बुडताना कोल्हापूर येथील महिलेला वाचविण्यात स्थानिक पोलीस, जीवरक्षक व मोरया वॉटर स्पोर्टच्या सदस्यांना मोठे यश आले. प्रियंका बालाजी सपाटे (वय वर्षे 30 रा. मंगळवार पेठ तालुका जिल्हा कोल्हापूर) असे या बुडताना वाचविलेल्या महिलेचे नाव आहे.
प्रियंका सपाटे या रविवारी गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आपल्या कुटुंबीयांसमवेत आल्या होत्या. त्यावेळी सपाटे यांचे सर्व कुटुंबीय देवदर्शन झाल्यानंतर प्रथमत: आंघोळीसाठी ते समुद्रात उतरले. यावेळी प्रियंका सपाटे या खोल समुद्रात गेल्या असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या खोल पाण्यामध्ये बुडू लागल्या.
यावेळी येथे कर्तव्यावर असलेले गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस नाईक प्रशांत लोहलकर, पोलीस शिपाई सागर गिरीगोसावी व गणपतीपुळे ग्रामपंचायतचे जीवरक्षक आणि मोरया वॉटर स्पोर्टच्या सदस्यांना सदर बाब निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ गणपतीपुळे समुद्राकडे धाव घेऊन संबंधित महिलेला खोल समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर प्रथमतः या महिलेवर प्राथमिक उपचार केल्यानंतर तात्काळ गणपतीपुळे देवस्थानच्या ॲम्बुलन्सने तिला अधिक उपचारासाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवण्यात आले.
मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मधुरा जाधव यांनी वेळेत या महिलेवर उपचार करून त्यांची प्रकृती सुधारली. सध्या प्रियंका सपाटे या स्थिर झाल्या असून त्यांना घरी पाठवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली. एकूणच बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यात विशेष योगदान देणाऱ्या पोलीस, जीवरक्षक व मोरया वॉटर स्पोर्टच्या सर्व सदस्यांचे गणपतीपुळे परिसरातून विशेष कौतुक होत आहे.