(पाचल / प्रतिनिधी)
प्रशासनात मराठी प्रशासकीय अधिकारी यांचं स्वराज्य निर्माण करून दिल्लीचं तक्त काबीज करण्यासाठी निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन चळवळ सुरू केली असे प्रतिपादन कनिष्ठ अनुवाद अधिकारी सीमा शुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय भारत सरकार तथा तिमिरातून तेजाकडे संस्थापक सत्यवान रेडकर यांनी पाचल येथे बोलताना केले.
ग्रामआधार स्वयंसेवी संस्था, चिपळूण यांच्यावतीने सरस्वती विद्यामंदिर, पाचल येथे निशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तिमिरातून तेजाकडेचे प्रणेते सत्यवान रेडकर आपले 154वे व्याख्यान देताना बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, जामदाखोरे शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष सुहासभाई आयरे, सरस्वती विद्यामंदिर मुख्याध्यापक तानाजी देसाई, पत्रकार तुषार पाचलकर, संस्था अध्यक्ष तथा पत्रकार शरद मोरे, अशोक रायबागकर, नलिनी आयरे आदी उपस्थित होते. सत्यवान रेडकर, जनार्दन परबकर, सुहासभाई आयरे यांचा शाल आणि पुष्यगुच्छ देऊन संस्था अध्यक्ष शरद मोरे यांनी सत्कार केला.
प्रत्येक गावात प्रशासकीय अधिकारी
सत्यवान रेडकर आपल्या मार्गदर्शन करताना म्हणाले, माझा जन्म ही सामान्य कुटुंबात झाला. शैक्षणिक परीक्षा फ्री भरताना कसरत करावी लागली. मी कधीही परिस्थितीचे भांडवल करीत बसलो नाही. शालेय जीवनात 9वी नापास झालेला विद्यार्थी प्रशासकीय सेवेत अधिकारी बनण्याचं आई वडिलांचे स्वप्न मी पूर्ण केलं. आणि आता कोकणातील प्रत्येक गावात प्रशासकीय अधिकारी तयार करण्याचा निर्धार करून आपण तिमिरातून तेजाकडे ही चळवळ सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.
तरुणांना नोकरीची संधी
आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोग, महाराष्ट्र सेवा आयोग, बँकिंग, सरळ सेवा भरती आदी समजून देऊन त्यासाठी कोणती पात्रता असते याची सविस्तर माहिती दिली. आपल्याला महाराष्ट्र पोलीस भरतीची माहिती असते मात्र, केंद्रीय पोलीस यांची माहिती नसल्याने महाराष्ट्रातून या भरतीकडे कोणी वळत नसल्याचे श्री. रेडकर यांनी सांगितले.
आता पासून परीक्षेची तयारी
शालेय जीवनातून स्पर्धा परीक्षेचे तयारी विद्यार्थ्यांनी केली पाहिजे. त्यासाठी स्थिर आणि बदलते जनरल नॉलेज यांचे स्पष्टीकरण करून विद्यार्थी यांनी आता पासून आपली वही तयार करून त्यात नोंदी कराव्यात. 2 ते 30 पर्यंत पाडे तोंड पाठ करून घेण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
कायम तुमच्या संपर्कात
विद्यार्थ्यांमध्ये शासकीय स्पर्धा परीक्षा यांच्या बाबत आवड निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन उपक्रम राबवून थांबत नाही तर या मार्गदर्शन उपक्रमाद्वारे विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून व्हाट्सअप, ट्वीटर,युट्युब यांच्या माध्यमातून आणि व्यक्तिगत पातळीवर जेव्हा जेव्हा विदयार्थ्यांना माझी आवश्यकता भासेल तेव्हा तेव्हा मार्गदर्शन करण्यास मी उपलब्ध असतो असे सत्यवान रेडकर यांनी सांगितले.
*स्पर्धेत टिकण्यासाठी चिकाटी आवश्यक:परबकर*
राजापूर पोलीस निरीक्षक जनार्धन परबकर आपल्या भाषणात बोलताना सांगितले की, स्पर्धा परीक्षेची तयारी ही एका दिवसात होत नाही तर तीची तयारी अगोदर पासून केली पाहिजे.स्पर्धेत टिकायचे असेल तर चिकाटी महत्वाची आहे. नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत 160 जागेसाठी सुमारे 1300 अर्ज आले. यावरून नोकरीत किती स्पर्धा आहे हे दिसून येते
ग्रामआधारचा पुढाकार:मोरे
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ग्रामआधार स्वयंसेवी संस्था अध्यक्ष शरद मोरे यांनी सांगितले की, पाचल परिसरातील तरुण तरुणींना शासकीय सेवेत संधी मिळावी म्हणून आपण कायम प्रयत्नात असतो. पोलीस भरती अनुषंगाने मिळंद येथे कार्यक्रम घेतला होता त्यावेळी तत्कालीन तहसीलदार प्रतिभा वराळे, पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी मार्गदर्शन केले होते. अलीकडे सत्यवान रेडकर यांच्या तिमिरातून तेजाकडे चळवळीत सहभागी झालो आणि त्याच माध्यमातून पाचल येथे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजित करण्याची संधी मिळाली. ग्रामआधार स्वयंसेवी संस्थेचा कायम पुढाकार असेल असा विस्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
उपक्रमाचे कौतुक: रायबागकर
सरस्वती विद्यामंदिर, पाचल भाग शाळेचे शिक्षक अशोक रायबागकर समारोपीय भाषणात म्हणाले, ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन होणे आवश्यक होते.आणि ग्रामआधार स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम राबवल्या बद्दल त्यांचे कौतुक करावे लागेल असे त्यांनी सांगितले.
नासा परीक्षेर्थीना प्रोत्साहन
पाचल बिटस्तरावर नासा संशोधन परीक्षेत यशस्वी झालेल्या दहा विद्यार्थ्यांना ग्रामआधार संस्थेच्यावतीने शिवाजी कोण होता हे पुस्तक देऊन सत्यवान रेडकर, पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या मध्ये श्रेया श्रीधर चव्हाण, आर्या अनिल सुर्वे, सार्थक दीपक गांगण, महेश लक्ष्मण चौगुले, शिवराज मनोहर पाटील, तेजल संजय कुवळेकर, ओंकार तानाजी पाटेकर,शिवम एकनाथ शिवगण, निनाद निशिकांत शिंदे, समृद्धी चंद्रकांत पांचाळ या ग्रामीण विद्यार्थ्यांचा समावेश होता.
स्कॉलरशिप उत्तीर्ण विद्यार्थी सत्कार
सरस्वती विद्यामंदिर, पाचलच्या आठ विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप परीक्षेत यश संपादन केले त्यांना ग्रामआधार संस्थेच्या वतीने शिवाजी कोण होता हे पुस्तक देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये उच्चप्राथमिक विभाग सार्थक रामजी आगटे जिल्ह्यात 9वा, स्वराज्य धनाजी भोसले जिल्ह्यात 57 वा, सोहम श्रीकांत मुंडे जिल्ह्यात 85 वा, आश्लेषा विशाल घोलप जिल्ह्यात 133 वी तर पूर्व माध्यमिक विभागात आर्या प्रविण किंजळस्कर जिल्ह्यात 20वी, श्रावणी रविंद्र लाड जिल्ह्यात 81वी, सतेज सिंडगौडा भोळे तालुक्यात 3 रा, सादअल्ली मुसाअल्ली पिरजादे तालुक्यात 5वा या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करताना सत्यवान रेडकर यांनी मुलांना बोलक केलं. मार्गदर्शन चालू असताना टाळ्या आणि शिट्टी वाजवून प्रतिसाद देत मार्गदर्शनाचा आनंद लुटला. या मार्गदर्शन कार्यक्रमाला सुमारे 1200 विद्यार्थी सहभागी झाले होते.