(मुंबई)
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळं मुंबईत खळबळ उडाली आहे. आशिष शेलार यांच्या कार्यालयात निनावी पत्र आलं होतं. त्या पत्रातून शेलारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शेलार यांच्या कार्यालयाद्वारे याबाबत पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, आशिष शेलार यांच्या वांद्रे येथील कार्यालयात हे पत्र आलं आहे. कार्यालयाच्या लेटर बॉक्समध्ये शुक्रवारी अज्ञात व्यक्तीने पाठवलेले पत्र सापडले.
प्रसिद्ध उद्योगपती नवीन जिंदल आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आक्रमक राहिलात तर मुंबईच्या चौपाटीवर हातपाय तोडून कुटुंबासह संपवणार असल्याची धमकी अज्ञात आरोपीनं पत्राद्वारे दिली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
गेल्या वर्षी देखील जानेवारी महिन्यात आशिष शेलार यांना अज्ञात आरोपीनं फोन करून अश्लिल भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता यावर्षी जानेवारी महिन्यातच आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळं त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली जात आहे. हातानं लिहिलेलं हे पत्र असून या पत्रात आशिष शेलारांसह भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात असभ्य भाषेचा वापर करण्यात आला आहे. या पत्रात आक्षेपार्ह भाषेतही काही मजकूर लिहिला असल्याची माहिती मिळत आहे.