( जाकादेवी/वार्ताहर )
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा नं.१ या शाळेला शाळेचे माजी विद्यार्थी व समाजसेवक एकनाथ शिवराम शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक साहित्याची भेट देऊन शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
एकनाथ शिंदे हे आदर्श प्राथमिक शाळा कळझोंडी नंबर १ या शाळेचे माजी विद्यार्थी असून ते सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचा लौकिक आहे. संवेदना फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी रायगड जिल्ह्यातील शांतीवन-पनवेल येथील कुष्ठरोग्यांना मानवतावादाच्या दृष्टिकोनातून प्रतिवर्षी दिवाळीचा फराळ वाटप करत असतात. कुष्ठरोग्यांबरोबर सहभोजनाचे अनेक कार्यक्रम घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. दापोली तालुक्यातील अंध शाळेतील अंध मुलांना ते आर्थिक मदतीचा सढळ हस्ते हात देत आले आहेत.
आपल्या मायभूमीतील कळझोंडी गावात नरडोबा मंदिरासाठी समाजसेवक एकनाथ शिंदे यांनी सामाजिक बांधिलकी जपत भरीव आर्थिक मदत दिली आहे. या मंदिराचा उद्घाटन समारंभ समाजसेवक एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यावेळी सन्मानपूर्वक करण्यात आला होता.
२६ जानेवारी- प्रजासत्ताक दिनानिमित्त प्राथमिक शाळा कळझोंडी नं. १ या आदर्श शाळेला दिलेल्या शैक्षणिक साहित्याच्या स्तुत्य आणि अनुकरणीय देणगीबद्दल शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक राजकुमार जाधव, सहाय्यक शिक्षिका सौ. चित्रा ठाकुर ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय शितप, अमृत महोत्सवपूर्ती सोहळा शाळा सुधार कमिटीचे अध्यक्ष व गावचे धडाडीचे उपसरपंच प्रकाश रामचंद्र पवार यांनी दानशूर देणगीदार व सामाजिक कार्यकर्ते एकनाथराव शिंदे यांचे आभार मानले.
फोटो – कळझोंडी नं.१ शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना सामाजिक कार्यकर्ते एकनाथ शिंदे सोबत संजय शितप, प्रकाश पवार, मुख्याध्यापक राजकुमार जाधव, गावातील प्रतिष्ठित नागरिक व लाभार्थी विद्यार्थी.