(रत्नागिरी)
रक्तदान शिबीराचा इतिहास रचणारे सामाजिक कार्यकर्ते आणि मसिहा फाउंडेशन रत्नागिरी चे संस्थापक जकी खान यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त मसिहा फाउंडेशन रत्नागिरी यांचे मार्फत रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सुरुवातीपासूनच या रक्तदान शिबीरामध्ये रक्तदात्यांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिल्याने रक्तपेढीतील जागा कमी पडू लागली त्यामुळे हे शिबीर सिव्हिल हॉस्पिटलमधील खुल्या जागेत घ्यावे लागले. एका वेळी येथे तब्बल 10 रक्तदाते रक्त देत होते.
जकी खान यांच्या सामाजिक कार्याची दखल व ते करीत असलेल्या कामांची पोचपावती या रक्तदात्यांनी दिली होती. त्यांच्या एका हाकेला साद देत प्रचंड प्रमाणात तरूणांनी रक्तदनात सहभाग घेतला. यामध्ये महिलांनीही उत्स्फूर्तपणे रक्तदान करून या शिबीरामध्ये एक नवीन इतिहास रचला. प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल 204 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करुन या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करत एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला.
आपल्या विनंतीला मान देवून ज्यांनी या शिबीरात सहभाग घेऊन ते यशस्वी केले, अशांचे आभार मसिहा फाउंडेशन रत्नागिरी चे संस्थापक जकी खान, अध्यक्ष तसव्वर खान, उपाध्यक्ष राशीद काझी, सचिव मंजूर शेख, खजिनदार तौहीद भाटकर यांनी मानले. यावेळी संकलित झालेले रक्त हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्तपेढीत जमा झाले असून गरजू गरीब रुग्णांना ते मोफत उपलब्ध होईल, असे जकी खान यांनी सांगितले. यावेळी मसिहा फाउंडेशन रत्नागिरी चे सर्व पदाधिकारी, सभासद तसेच शहर व परिसरातील नागरिक, रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.