( रत्नागिरी /प्रतिनिधी )
रत्नागिरी तालुक्यातील निराधारांचा आधारवड ठरलेल्या माहेर संस्थेत 74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेतील 74 वर्षाच्या आजी श्रीमती कुसुम शिवलकर यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकावून हा सण साजरा करण्यात आला. भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून 74 वर्षे पूर्ण झाली आहेत. माहेर संस्थेच्या संस्थापिका संचालिका लुसी कुरियन यांच्या संकल्पनेने ध्वज फडकवण्याचा मान ज्येष्ठ नागरिक 74 वर्षाच्या आजीला देण्यात आला. माहेर संस्थेतील सर्व प्रवेशितांनी तिरंगा ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत व ध्वजगीत गायिले. माहेर संस्थेचे अधीक्षक, प्रकल्प प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी माहेर संस्थेतील सर्व प्रवेशित व कर्मचारी उपस्थित होते.