(नवी दिल्ली)
भारताचा ३६० डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादवच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. आयसीसीने त्याला वर्ष २०२२ चा टी २० क्रिकेटर ऑफ द इयर घोषित केले आहे. कारण सूर्यकुमार यादवने २०२२ या वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या. तो आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये एका वर्षात १००० पेक्षा जास्त धावा करणारा जगातील दुसरा क्रिकेटर बनला होता.
सूर्यकुमार यादवने २०२२ हे वर्ष गाजवले. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १८७.४३ च्या जबरदस्त सरासरीने ११६४ धावा केल्या. सरत्या वर्षात सूर्यकुमार यादव टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
सूर्यकुमार यादवने गेल्या वर्षी टी-२० क्रिकेटमध्ये दोन शतके ठोकण्याचा जगत पराक्रम केला होता. त्याने पहिले शतक हे इंग्लंडविरूद्ध ठोकले तर दुसरे न्यूझीलंडविरूद्ध ठोकले. सूर्यकुमार यादवने गेल्या वर्षी टी-२० क्रिकेटमध्ये दोन शतकांबरोबरच ९ अर्धशतकेदेखील ठोकली आहेत. सूर्यकुमारने गेल्या वर्षी षटकारांचाही पाऊस पाडला होता. त्याने ६८ षटकार मारले. एका वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आता त्याच्या नावावर आहे.