(चिपळूण)
सोनगाव येथील गोशाळेचे बांधकाम हटविण्यासाठी ४५ दिवसांची मुदत एमआयडीसीने मागितली आहे. ही गोशाळा अधिकृत करण्यासाठी अद्याप प्रस्ताव आलेला नाही. ४५ दिवसांत तसा प्रस्ताव आला तर गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन तो प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल, असे आश्वासनही एमआयडीसीकडून देण्यात आले. त्यामुळे सोनगाव येथील ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.
लोटे औद्योगिक वसाहतीतील सोनगाव हद्दीत अनधिकृतपणे उभ्या असलेल्या पिंपळी येथील ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थानच्या गोशाळेचे बांधकाम लेखी आश्वासन देऊनही एमआयडीसीने हटविले नाही. त्याच्या निषेधार्थ सोनगाव ग्रामस्थांनी सोमवारपासून खेर्डी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.
उपोषणकर्ते आणि अधिकारी यांच्यात दोन दिवस वारंवार चर्चा होऊनही तोडगा निघाला नाही. सोनगावबरोबरच परिसरातील ग्रामपंचायतींनीही संयुक्तपणे पत्रव्यवहार करत ही गोशाळा हटवण्याची मागणी लावून धरली होती. यानंतर एमआयडीसीनेही या गोशाळेत करण्यात आलेले अतिक्रमण काढून टाकण्याबाबत नोटीस बजावली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. एमआयडीसी हद्दीत गोशाळा अनधिकृत ठरवूनही त्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अखेर सोनगावमधील सुमारे दोनशेहून अधिक ग्रामस्थांनी खेर्डी एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, उपजिल्हा प्रमुख प्रताप शिंदे यांनी सकाळी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. सायंकाळी शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रकांत चाळके, आमदार भास्कर जाधव यांचे स्वीय साहाय्यक संतोष तांदळे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चर्चेदरम्यान ४५ दिवसांत बांधकाम काढण्याचा प्रस्ताव आला तर गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन तो प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल, असे आश्वासनही एमआयडीसीकडून देण्यात आले