( रत्नागिरी / प्रतिनिधी )
लांजातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तरुणाने पीडितेला 8 महिन्याची गर्भवती ठेवली होती. याप्रकरणी तरूणाला रत्नागिरी पॉक्सो न्यायालयाने सुनावलेली 10 वर्ष सक्तमजुरी व 37 हजार रूपये दंडाची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. समीर शशिकांत जाधव (21, शिपोशी बौद्धवाडी) असे आरोपीचे नाव आह़े. समीर जाधव याने उच्च न्यायालयात अपील केले होते.
सविस्तर वृत्त असे की, पीडित मुलगी व आरोपीत प्रेमसंबंध होत़े. 24 ऑगस्ट 2018 रोजी पीडित मुलगी महाविद्यालयातून सायंकाळी घरी न परतल्याने तिच्या आईने लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्या मुलीला आरोपी समीर जाधव याने फूस लावून पळवून नेल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये उघड झाले. पोलिसांकडून पीडित मुलीला ताब्यात घेऊन तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता ती 8 महिन्यांची गरोदर असल्याची बाब समोर आल़ी. पोलिसांकडून पीडितेची अधिक चौकशी केली असता तिने समीर जाधव याने 15 ते 16 जून 2018 दरम्यान शिपोशी येथील जंगलमय भागात नेवून आपल्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवल्याचे तिने सांगितले. लांजा पोलिसांनी समीर याच्याविरूद्ध भादंवि कलम 363, 376, 504 व 506 व बालकांच्या लैगिक अत्याचारापासून प्रतिबंध अधिनियम 2012 नुसार गुन्हा दाखल केल़ा. या घटनेचा तपास लांजाचे पोलीस उपनिरीक्षक रेखा जाधव यांनी करून समीर याच्याविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र व विशेष पॉक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला आबासाहेब राऊत यांनी समीर जाधव याला दोषी मानून 10 वर्ष सक्तमजुरी व 37 हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे एकूण 15 साक्षीदार तपासण्यात आल़े. पोक्सो न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात समीर याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होत़े. पीडित मुलीचे वय व डीएनए रिपोर्ट लक्षात घेता न्यायालयाने हे अपील फेटाळून लावत शिक्षा कायम ठेवली.