(दापोली)
दापोलीतील उपविभागीय अधिकारीपदाच्या कार्यकाळात केलेल्या अनियमिततेचा ठपका ठेवून तत्कालीन विभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांच्यावर नागरी सेवा नियम १९७९च्या कलम ८ अन्वये निलंबन करून त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुरुड येथील साई रिसॉर्टला बिनशेतीची परवानगी देशपांडे यांच्याच कालावधीत मिळाली आहे.
साई रिसॉर्टची उभारणी करताना तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. शिवाय या बाबत त्यांनी विविध ठिकाणी तक्रारीही केल्या. यानंतर हे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या रिसॉर्टला बिनशेतीची परवानगी जयराम देशपांडे यांच्याच यांच्याच कालावधीत मिळाली आहे. यामुळे देशपांडे यांना हे प्रकरण भोवल्याचे बोलले जात आहे. देशपांडे हे सध्या रायगड जिल्ह्यात रोजगार हमी योजनेचे उपविभागीय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. या निलंबनाच्या काळात त्यांनी खासगी नोकरी स्वीकारू नये, कोणताही धंदा करू नये (त्यांनी तसे केल्यास ते दोषारोपास पात्र ठरतील व त्या अनुषंगाने त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येईल) व तसे केल्यास ते निलंबन निर्वाह भत्ता गमाविण्यास पात्र ठरतील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.