( राजापूर/ प्रतिनिधी )
राजापूर तालुक्यातील करक पांगरी विविध कार्यकारी सोसायटीमध्ये भष्ट्राचार झाला असून या भष्ट्राचाराची चौकशी करा अन्यथा आपण रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे नंदकुमार शेट्ये यांनी निवेदनात म्हटले आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदार, राजापूर, पोलिस अधीक्षक रत्नगिरी, जिल्हा निबंधक रत्नागिरी, पोलिस निरीक्षक राजापूर याना दिले आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, ऑगस्ट २०२२ रोजी करंक ग्रामपंचायत येथे जिल्हा निबंधक कार्यालयाचे कांबळे हे सभासदांनी दिलेल्या तक्रारीनुसार चर्चा करण्यासाठी आले होते. त्यानंतर सभासदांनी आपल्या तक्रारी कांबळे यांच्याकडे सादर केल्या. तद्नंतर जिल्हा निबंधक यांनी सहाय्यक निबंधक, राजापूर यांना नोटीस काढून संस्थेचा संपूर्ण दप्तर मागून घेण्यास सांगितले परंतु अद्यापही सचिव यांनी संस्थेबाबतचे एकही कागदपत्र सहाय्यक निबंधक, राजापूर यांना दिलेले नाही. करक पांगरी विविध कार्यकारी सोसायटी मध्ये बिनशेती कर्ज शेती कर्जात विलीन करून शासनाची घोर फसवणूक केलेली आहे.
दरम्यान सहाय्यक निबंधक, राजापूर ०२/११/२०२२ ला स्मरणपत्र संस्थेला दिले होते. तरी देखील संस्थेच्या त्या पत्राला केराची टोपली दाखविली. मा. जिल्हा निबंधक कार्यालय, रत्नागिरी यांचेकडे करक पांगरी सोसायटी बद्दल कोणतीही कागदपत्र राजापूर ऑफिस मधून अद्यापतरी आलेले नाही.
सहाय्यक निबंधक राजापूर, यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेतली असता त्यांनी सध्या राजापूर अर्बन बँकेची इलेक्शन चालू आहे असे उत्तर दिले. परंतु सभासदानी दिलेले तक्रार अर्जाला जवळजवळ ६ महिने उलटून गेले तरी जिल्हा निबंधक कार्यालय, रत्नागिरी यांच्याकडे अद्यापपर्यंत कोणतेही कागद पाठविले नाही.
त्यामुळे कोणताही अहवाल करता येत नाही. राजापूर सहाय्यक निबंधक कार्यालय, हे करक पांगरी सोसायटीला पाठीशी घालत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, २६ जानेवारीपर्यंत भष्ट्राचारी सोसायटीची चौकशी नाही झाली तर शेट्ये हे जिल्हा धिकारी कार्यालय रत्नागिरी येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत असे त्यांनी नमूद केले आहे. तसेच राजापूर कार्यालयाकडून काही कारण नसताना विलंब लागत आहे. तरी चौकशीअंती करक पांगरी सोयायटी व मा. सहाय्यक निबंधक राजापूर व त्यांचे संबंधित कर्मचारी यांची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.