(रत्नागिरी)
संपूर्ण महाराष्ट्रात सहकार चळवळीत भक्कमपणे उभारी घेत असलेल्या खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या दाभोळ शाखेचा उद्घाटन सोहळा अतिशय थाटात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष तथा स्वामी स्वरूपानंद पतसंस्था अध्यक्ष अॅड.श्री.दीपक पटवर्धन यांच्या हस्ते व सौ.स्मिता जावकर, सौ.संगिता दाभोळकर, सहाय्यक निबंधक श्रीमती तृप्ती उपाध्ये व श्री रविंद्र नाटेकर यांच्या उपस्थितीत सकाळी ११.३० वाजता ढोलताशांचा गजरात उद्घाटन सोहळा संपन्न झाला. संस्थेच्या अंतर्गत कार्यालयाची पाहणी करताना सर्वच पाहुण्यांनी गौरवोद्गार काढले.
संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी प्रास्ताविक करताना संस्थेचा चढता आलेख हा समाजबांधव व सभासदांचे सहकार्यामुळेच शक्य झाले आहे यामुळेच आम्ही सर्व संचालक, प्रशासकीय अधिकारी व समन्वय समिती सदस्य हे धनुष्यबाण पेलवत आहोत. असेच सहकार्य सर्वांकडून अपेक्षित असून उर्वरित मंजूर झालेल्या शाखा लवकरच आम्ही सुरू करू असे जाहीर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष श्री.सुधीर वासावे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संचालिका सौ दिप्ती कोळथरकर यांनी केले. खारवी समाजाची पतसंस्था दाभोळ गावात सुरू होऊन खऱ्या अर्थाने एक पाऊल आर्थिक सक्षमतेकडे पडत असल्याने पंचक्रोशीतील सर्वांनी समाधान व्यक्त केले.