(मुंबई)
कोविड-१९ मुळे मरण पावलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान, रेल्वे मालमत्तेचे मुद्रीकरण, जुनी पेन्शन योजना अशा अनेक प्रलंबित मागण्यांकडे रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधण्यासाठी रेल्वे कर्मचारी संप करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. या सर्व मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आज सोमवारी २३ जानेवारीला मुंबईत रेल्वे कर्मचारी युनियनची बैठक होणार आहे.
केंद्र सरकारच्या इतर कर्मचा-यांसह रेल्वे युनियनची राष्ट्रीय संघटना सोमवारी विविध मुद्यांवर देशव्यापी संपाची रणनिती ठरविण्यासाठी लोअर परेल कारखान्यात बैठक घेणार आहे. रेल्वेतील राष्ट्रीय पेन्शन प्रणाली रद्द करण्याची मागणी युनियनने केली आहे. तसेच रेल्वे उत्पादन युनिटचे कॉर्पोरेटायझेशन, रेल्वे उपक्रमांचे आऊटसोर्सिंग आदी मागण्यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यानंतर संपाचा इशारा देण्यात येणार आहे.