आता कोरोना चाचणीची नविन पद्धत शोधून काढण्यात आली आहे. ‘सलाईन गार्गल आरटी-पीसीआर’ पद्धतीला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांना केवळ तीन तासांत या कोरोना चाचणीचा अहवाल हातात मिळू शकेल. चाचणीची ही नवी पद्धत पायाभूत सुविधा कमी असणाऱ्या ग्रामीण भागांत तसेच अतिशय दुर्गम भागांना अधिक फायदेशीर ठरू शकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. ICMR कडून NEERI च्या आपल्या टीमला देशभरातील लॅबमध्ये या नव्या पद्धतीची ट्रेनिंग देण्यासाठी पाठवण्यात येणार आहे.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) अंतर्गत नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) च्या शास्त्रज्ञांनी चाचणीच्या या पद्धतीसहीत एका नवा टप्पा गाठला आहे. सलाइन गार्गल आरटी-पीसीआर या पद्धतीच्या चाचणीत, रुग्णांची खारट पाण्याची गुळणी करून ती एका सामान्य ‘कलेक्शन ट्यूब’मध्ये जमा केली जाते. हा नमुना लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवला जातो. एका विशिष्ट तापमानात, NEERI कडून तयार करण्यात आलेल्या एका विशिष्ट सोल्युशनमध्ये हा नमुना ठेवला जातो. हे सोल्युशन गरम केल्यानंतर एका ‘RNA’ टेम्प्लेट तयार होते. त्यानंतर या सोल्युशनवर ‘आरटी-पीसीआर’ प्रक्रिया केली जाते. चाचणीच्या या नव्या पद्धतीत नमुने गोळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणं खूप स्वस्त पडते, असे ‘नीरी’चे पर्यावरण विषाणू कक्षाचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. कृष्णा खैरनार यांनी म्हटले आहे.
ही प्रक्रिया ‘सेल्फ सॅम्पलिंग’ला परवानगी देत असल्यामुळे लोक आता स्वतःहून कोरोनाची चाचणी करू शकणार. या चाचणीसाठी नमुने देताना नागरिकांना चाचणी केंद्रांवर वाट पाहण्याची किंवा गर्दीत उभे राहण्याची गरज लागणार नाही. यामुळे बराचसा वेळही वाचतो. या पद्धतीत कमीत कमी कचरा निर्माण होतो. तसेच संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी ही पद्धत फायदेशीर ठरेल, असे डॉ. खैरनार यांनी म्हटले आहे
Post Views: 195