(गुहागर)
काल गुरूवार दि. १९ जानेवारी रोजी हेदवी येथील जाधव कुटूंब आणि सोबत असलेले त्यांचे नातेवाईक असे एकूण १० व्यक्ती माणगाव येथील ईको कारच्या झालेल्या अतिशय भीषण अपघातात मृत्युमुखी पडले.
या व्यक्तींचे वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या माजी सदस्या सौ नेत्राताई ठाकूर तसेच त्यांच्या सोबत आलेले उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर, हेदवीच्या सरपंच सौ. आर्या मोरे, वेळणेश्वरचे सरपंच चैतन्य धोपावकर, वाडदईचे मा. तंटामुक्ती अध्यक्ष विनायक कांबळे, उमराठचे मा. तंटामुक्ती अध्यक्ष संदीप गोरिवले यांनी रात्री अंत्यदर्शन घेऊन मृतांच्या पवित्र आत्म्यास श्रद्धांजली वाहिली आणि सुनिल जाधव कुटूंबिंयांचे सांत्वन करून अचानक ओढवलेल्या दुःखातून बाहेर येण्यासाठी जाधव कुटूंबिंयाना धीर व दिलासा दिला.
यावेळी उमराठच्या ग्रामपंचायतीचे सहाय्यक नितीन गावणंग, रोजगार सेवक प्रशांत कदम, ग्रामस्थ महेश गोरिवले, अजीत गावणंग, श्रीकांत कदम इत्यादी मंडळी उपस्थित होते.
अपघातात मृत्यू पावलेल्या एकूण व्यक्ती
अमोल रामचंद्र जाधव (वय ४०) हेदवी
दिनेश रघुनाथ जाधव (वय ३६) हेदवी
कांचन काशिनाथ शिर्के (वय ५०)
नंदिनी निलेश पंडित (वय ३५) डावखोत
निलेश पंडित (वय ४२) डावखोत
अनिता संतोष सावंत (वय ५५) सावंतवाडी
मुद्रा निलेश पंडित (वय १२) डावखोत
दिपक लाड(वय ५८) डावखोत
निशांत शशिकांत जाधव (वय २३)
भव्य निलेश पंडित (वय 3वर्ष 6 महीने)
सदर अपघात अत्यंत दुर्दैवी, अंगावर शहारे आणि हृदय भरून येण्यासारखा होता. हेदवी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने त्यांचे अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. यावेळी सर्वांचेच मन हेलावलेले होते. हेदवी गावात तसेच पंचक्रोशीत यावेळी सन्नाटा पसरलेला होता. वातावरण गंभीर व शोकाकुल होते आणि दुखाःश्रूने सर्वजण मृतांच्या पवित्र आत्मांस श्रद्धांजली वाहत होते. सदर मृत्युमुखी पडलेल्या ७ व्यक्तींवर हेदवी येथील स्मशानभूमीत, २ व्यक्तींवर मुंबई येथील स्मशानभूमीत तर १ व्यक्तीचे सावंतवाडी येथील स्मशानभूमीत रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
जाधव कुटूंबिंय आणि त्यांचे नातेवाईक यांना या अचानक ओढवलेल्या दुःखातून बाहेर येण्यासाठी धीर, शक्ती, मनोबल आणि आत्मविश्वास मिळो आणि मृतांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना आणि भावपूर्ण श्रध्दांजली.