(मुंबई)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुंबई दौ-यात ४० हजार कोटी किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली आहे. यासोबतच त्यांनी मुंबई मेट्रो रेल्वे लाईन २ आणि ७ याचेदेखील उद्घाटन केले आहे. यादरम्यान त्यांनी मेट्रोमध्ये प्रवास करण्याचा आनंददेखील घेतला. या दोन मेट्रो लाईन बनवण्यासाठी सुमारे १२,६०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आता या दोन्ही मेट्रो लाईन आजपासून सर्वसामान्यांसाठी खुल्या होणार आहेत.
मेट्रोच्या या ३५ किमी मार्गावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना सुमारे ६० रुपये खर्च करावे लागणार आहेत. मेट्रो ७ च्या १६.५ किमी मार्गावर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना सुमारे ३० रुपये खर्च करावे लागतील, तर मेट्रो-२ए च्या १८.६ किमी मार्गासाठी कमाल भाडे ३० रुपये असेल. हे दोन्ही मेट्रो कॉरिडॉर घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणा-या मेट्रो-३ कॉरिडॉरलाही जोडण्यात आले आहेत.
तासाचा होणारा प्रवास काही मिनिटांत होणार
मेट्रो २ए आणि मेट्रो ७ मार्गामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी सुलभ होणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचा तासांचा प्रवास काही मिनिटांत पूर्ण होणार आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ज्या मार्गावर ही मेट्रो उभारण्यात आली आहे, तो मार्ग सर्वात वर्दळीचा आहे. अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व असा हा मार्ग आहे. या मुख्य महामार्गावर मेट्रोच्या उभारणीमुळे अंधेरी ते दहिसर दरम्यान राहणा-या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. साधारणपणे सकाळी दहिसरहून मुंबईला येताना ३० मिनिटांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी एक ते दीड तास लागतो, तर संध्याकाळी ट्रॅफिकमध्ये अडकल्यासही तेवढाच वाया जातो. आता तोच प्रवास काही मिनिटांत होणार आहे. आता नवीन मेट्रो लाईन सुरु झाल्याने नागरिकांच्या वेळेची खूप मोठी बचत होणार आहे.