(मुंबई)
विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीत असलेला गोंधळ अद्यापही संपलेला नाही. काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांची कालबैठक झाली. पण राष्ट्रवादीचे नेते नसल्याने अंतिम निर्णय आज गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा करून अधिकृत निर्णय दुपारपर्यंत घोषित केला जाईल, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी दिली. शिवसेना-कॉंग्रेसच्या बैठकीत व्यापक चर्चा झाली असून, यासंबंधीची घोषणा आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांवरून राज्यातील राजकारण पेटले आहे. महाविकास आघाडी नेमक्या कोणत्या उमेदवारांना पाठिंबा देणार याचा निर्णय प्रलंबित आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी काल संध्याकाळी बैठक झाली. मात्र या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित नव्हते. या बैठकीनंतर माहिती देताना अशोक चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेचसे प्रमुख नेते मुंबईत उपस्थित नव्हते. मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खा. विनायक राऊत, खा.अरविंद सावंत आजच्या बैठकीस उपस्थित होते. अतिशय सकारात्मक अशी चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुरूवारी चर्चेला येतील. त्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल. दुपारपर्यंत महाविकास आघाडीचा अंतिम निर्णय घोषित करण्यात येईल, असे अशोक चव्हाण म्हणाले.