(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यात 399 प्राथमिक शिक्षकांनी बदलीसाठी तयारी दर्शवली आहे. बदलीसाठी शिक्षक अधिक आणि 600हून कमी शाळा उपलब्ध असल्यामुळे अनेक शिक्षकांना पसंतीची शाळा मिळालेली नाही.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या तिसऱ्या टप्प्यात पात्र ठरलेल्या 1 हजार 473 पैकी 399 जणांनी बदल्यांसाठी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. येत्या 2 दिवसात त्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. अवघड क्षेत्रातील 30 टक्केहून कमी शिक्षकांनी बदलीसाठी तयारी दर्शवल्याचे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
पहिल्या 2 टप्प्यातील बदल्यांची यादी नुकतीच जाहीर झाली. आता तिसऱ्या टप्प्यातील प्रक्रिया सुरु आहे. बदल्यांसाठी शाळा विकल्प भरण्याची मुदत नुकतीच संपुष्टात आल्याने बदली अधिकार पात्र ठरलेल्या म्हणजेच अवघड क्षेत्रात शाळेत सलग 10 वर्षे आणि एकाच शाळेत 5 वर्षे कार्यरत असलेल्या शिक्षकांची यादी तयार केली आहे. जिल्ह्यात 1 हजार 473 शिक्षक अवघड क्षेत्रात काम करणारे होते. त्यांना बदलीसाठी शाळा विकल्प भरण्यासाठी मुदत दिली होती. ती संपुष्टात आली असून 399 शिक्षकांनी बदलीसाठी तयारी दर्शवली आहे.