(खेड / इक्बाल जमादार)
नुकत्याच जाहीर झालेल्या इ.५वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत दापोलीच्या १९ विद्यार्थ्यांनी आपली नावे कोरली. दापोली तालुक्यातील जि.प. शाळा बोरीवली शाळेचा मिहीर संदेश चव्हाण, जि.प.शाळा फरारेचा संवेद सचीन घोरपडे आणि जि.प.प्राथमिक शाळा कोळथरे मधील शुभम जयंत जोशी या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गुणवत्ता यादीत अनुक्रमे सातवा, नववा आणि दहावा येण्याचा मान मिळवून व्हिजन दापोलीचा झेंडा अटकेपार लावला. यासह गुणवत्ता यादीत आलेले सर्वच्या सर्व १९ विद्यार्थी हे खेडोपाड्यातील जि.प. शाळेत शिकणारे विद्यार्थी असून सदर यशामागे व्हिजन दापोलीचा इम्पॅक्ट असल्याचे गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी सांगितले. राष्ट्रीय गुणवत्ता यादीत आलेल्या तिन्ही विद्यार्थ्यांच्या शाळेत जावून गटशिक्षणाधिकार्यांनी मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.
कोळथरे येथे शिक्षक, पालक, ग्रामस्थ तसेच केंद्रप्रमुख तालुकाध्यक्ष सुनिल कारखेले, विस्तार अधिकारी कल्याणी मुळ्ये यांचे उपस्थितीत शुभम जोशी याचा सत्कार करतांना अण्णासाहेब बळवंतराव यांनी तालुक्यातील ९९% शिक्षक हे जोमाने काम करीत असून पंचायत समिती तसेच जिल्हापरिषद रत्नागिरीचे सर्व उपक्रम प्रभावीपणे राबवीत असल्याचेही सांगितले.
तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी झटणार्या सर्व शिक्षकांना आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी त्यांनी धन्यवाद आणि शुभेच्छा दिल्या. तर दापोली दौर्यावर असलेले रत्नागिरी जिल्हा मुख्यकार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार यांचे हस्ते राष्ट्रीय गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी व नासा इस्रोमध्ये निवड झालेल्या विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी तथा प्रशासक आर एम. दिघे शिक्षण विभागातील सर्व विस्तार अधिकारी सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.