(मुंबई)
राज्यात सध्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांवर मोठी करवाई होताना दिसत असून अनिल देशमुख हे काही दिवसांपूर्वी तुरुंगाबाहेर आले आहेत, तर नवाब मलिक हे अद्याप तुरुंगातच आहेत. तर आता राष्ट्रवादीच्या राज्याबाहेरील एकमेव खासदार मोहम्मद फैजल यांना खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. लक्षद्वीपच्या करवत्ती जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्षद्विपचे खासदार मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे मानले जातात. फैजल यांना २००९ च्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान फैजल आणि अन्य तीन दोषींचा जामीन न्यायालयाने रद्द केला. फैजल हे २०१४ पासून संसदेत लक्षद्विप या केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
फैजल यांनी लोकांच्या एका गटाचे नेतृत्व केले होते, ज्यांनी सलीह यांच्यावर हल्ला केला होता. एका शेडच्या बांधकामावरून झालेल्या वादानंतर सलीह यांना करण्यात आलेल्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर सलीह यांना केरळला नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर अनेक महिने रुग्णालयात उपचार करण्यात आले. मोहम्मद सलीह हे लक्षद्वीपचे दिवंगत माजी लोकसभा सदस्य आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पीएम सईद यांचे जावई आहेत.
या प्रकरणात एकूण २३ आरोपी होते, त्यापैकी ४ आरोपींना शिक्षा झाली. फैजल यांच्यावर त्यांचे नातेवाईक मोहम्मद सलीह यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. दोषींवर प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या बाबत बोलताना फैसल म्हणाले की, हे प्रकरण राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे आणि आपण लवकरच वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करणार आहेत.