(नवी दिल्ली)
जगभरात वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मंदी येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, तर दुसरीकडे जगभरातील अनेक वित्तीय संस्थांनीदेखील यंदा मंदीचे सावट असणार असल्याची चेतावनी दिली आहे. आता जागतिक बँकेनेदेखील आर्थिक मंदीचा इशारा दिला आहे. अमेरिका (वर), युरोप आणि चीन या सर्व प्रमुख आणि आघाडीच्या अर्थव्यवस्थांच्या विकास दरात घट झाल्यामुळे चालू वर्षात जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली असणार असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे.
जागतिक बँकेने आपल्या वार्षिक अहवालात हा अंदाज व्यक्त केला आहे. जागतिक बँकेने २०२३ साठी जागतिक विकास दर १.७ टक्क्यांवर आणला आहे. याआधी हा दर ३ टक्के इतका होता. जागतिक बँकेने काल हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. जागतिक बँकेने वर्तवलेला अंदाज खरा ठरल्यास तीन दशकांत ही तिस-यांदा आर्थिक विकास दर सर्वात कमकुवत असणार असल्याचे म्हटले जात आहे.
यापूर्वी २००८ मधील जागतिक आर्थिक मंदी, वर्ष २०२० मध्ये कोरोना महासाथीमुळे जागतिक विकास दरात मोठी घसरण झाली होती. जागतिक बँकेच्या अहवालानुसार अमेरिका या वर्षी मंदी टाळू शकते. पण अमेरिकेचा विकास दर केवळ ०.५ टक्केच राहण्याचा अंदाज आहे.