(वैभव पवार / गणपतीपुळे)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थी निमित्त गजाननाच्या दर्शनासाठी हजारोंचा जनसागर लोटला होता. 2023 या वर्षात एकमेव अंगारकीचा योग असल्यामुळे घाटमाथ्यावरील सुमारे 50 ते 60 हजार गणेशभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावर्षी एकमेव अंगारकी चतुर्थी असल्यामुळे गणेशभक्त मोठ्या प्रमाणात येणार असा अंदाज वर्तविण्यात येत होता.त्यामुळे गणपतीपुळे ग्रामपंचायत, संस्थान श्री देव गणपतीपुळे व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुयोग्य नियोजन पाहावयास मिळाले.मंगळवार दि.10 जानेवारी रोजी पहाटे तीन तीस वाजता मुख्य पुजारी अमित घनवटकर व सहकारी ब्राह्मणवृंद यांच्या हस्ते विधीवत पूजा व आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
या अंगारकी यात्रा उत्सवासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, इस्लामपूर, कवठेमहांकाळ, मिरज आदींसह मुंबई, पुणे येथील गणेश भक्त गणपतीपुळे तीर्थक्षेत्री सोमवारी सायंकाळपासूनच गणपतीपुळे येथे दाखल झाले होते. गणेशभकतांना व्यवस्थित दर्शन मिळावे, यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून दर्शन लाईन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत रोषणाई करण्यात आली होती.तसेच गणपतीपुळे ग्रामपंचायतीमार्फत आलेल्या वाहनांची सागरदर्शन पार्किंग मध्ये व्यवस्था करण्यात आली होती.तसेच आपटातिठा, कोल्हटकर तिठा, मंदिर परिसर, एसटी बस स्थानक आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यांमध्ये सुमारे बावीस अधिकारी, 175 पोलीस कर्मचारी व 30 राखीव पोलीस दलाचे जवानांनी मोठी मेहनत घेतली.
दर्शन लाईन मधून गणेशभक्तांना सुलभ दर्शन व्हावे याकरिता पोलीस कर्मचारी यांचेसह रत्नागिरी येथील अनिरुद्ध उपासना केंद्राचे सुमारे 50 स्वयंसेवकांनी आपली कामगिरी चोख बजावली. तर आलेल्या गणेशभक्तांना आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास तात्काळ औषधोपचार मिळावेत यासाठी मंदिर परिसरात मालगुंड येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अक्षय धारिया, समुदाय अधिकारी डॉ. सय्यद आसिफ, आरोग्यसेवक एम.डी.सातव व कर्मचारी यांची टीम तैनात करण्यात आली होती.या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवानिमित्त कोल्हापूर येथील गणेशभक्तांनी श्रींची पालखी हार फुलांनी अतिशय आकर्षकरित्या सजवली होती.
यावेळी सायंकाळी 4.30 ते 5.30 या वेळेत ढोल ताशांच्या गजरात व चोख पोलीस बंदोबस्तात पालखी प्रदक्षिणा मिरवणूक सोहळा पार पडला. यावेळी घाटमाथ्यावरील गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
या अंगारकी यात्रा उत्सवात विशेष खबरदारी म्हणून गणपतीपुळे समुद्रकिनायावर पोलीस प्रशासनाकडून मेघा स्पीकर द्वारे समुद्राच्या खोल पाण्यात भाविकांनी जाऊ नये याकरिता योग्य त्या सूचना देण्याचे काम करण्यात आले. तसेच रत्नागिरी बस डेपो आणि घाटमाथ्यावरील बसडेपो यांचे मार्फत भाविकांच्या सोयीसाठी जादा फेया सोडण्यात आल्या होत्या.
एकूणच दिवसभरात अतिशय शांततेत व सुरळीतपणे हा अंगारकी यात्रोत्सव पार पडला. अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव मोठ्या उत्साहाने पार पाडण्यासाठी गणपतीपुळे देवस्थान समिती, गणपतीपुळे ग्रामपंचायत व पोलीस यंत्रणा यांनी विशेष मेहनत घेतली.