(रत्नागिरी / प्रतिनीधी)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत मत्स्य महाविद्यालय शिरगांव रत्नागिरी येथे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांतर्गत “पिंजऱ्यातील मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञान खाद्य आणि पाण्याचे व्यवस्थापन” या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन रत्नागिरी जिल्हयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले – गावडे उपस्थित होत्या. कृषि उद्योगाप्रमाणे मत्स्य उद्योगाला महत्व दिले तर राज्याचे आणि देशाच्या मत्स्य उत्पादनात वाढ होऊन आपल्यासाठी लागणा-या प्रथिने युक्त अन्न पदार्थाची गरज भागवण्यास मदत होईल, असे मत डॉ. फुले यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पी. ई शिनगारे यांनी भूषविले. यावेळी ते उपस्थित लाभार्थीना मार्गदर्शन करताना म्हणाले, पिंज-यांतील मत्स्य संवर्धन तंत्रज्ञान किफायतशीर असुन शेतक-यांचे सामाजिक आर्थिक जिवनमान उंचवण्यासाठी शाश्वत उपजिविकीचे साधन आहे.
तसेच डॉ. एस. डी. नाईक, विभागप्रमुख, मत्स्यसंवर्धन विभाग, यांनी गोडया पाण्यात पिंज-यांतील मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञान अवलंबण्यास वाव असून देशातील मत्स्य उत्पादनात महत्वपूर्ण योगदान लाभु शकते. या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे प्रसार व प्रचार केल्यास शेतक-यांना मत्स्य उत्पादन वाढीसाठी पर्याय उपलब्ध होऊ शकतो. असे शिनगारे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रकल्पाचे प्रमुख डॉ. बी. आर. चव्हाण यांनी प्रकल्पाअंतर्गत राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन सदरील दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये लाभार्थ्याना पिंज-यांतील मत्स्यसंवर्धनासाठी खाद्य व पाण्याचे व्यवस्थापन या विषयावर व्याख्याने व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात महाविद्यालयातील मत्स्यसंवर्धन विभागामधील तज्ञ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या शिबिराला लांजातील एकुण २० लाभार्थीनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद हणमंते तसेच मत्स्य महाविद्यालयातील विभागप्रमुख डॉ. सौ. एस. ए. मोहिते, डॉ. अनिल पावसे व इतर प्राध्यापक वृंद उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकल्प उपप्रमुख डॉ. एस. एस. देशमुख, तर आभार प्रदर्शन डॉ. आर. के सदावर्ते यांनी केले.