(मनोरंजन)
शाळेत असताना आईवर चार ओळी लिहायला सांगितल्या असता कितीतरी वेळ काय लिहावे, असा प्रश्न पडत असे. आता मोठे झाल्यावर आईबद्दल लिहायला-बोलायला विचारल्यावर शब्दच अपुरे पडतात. आई म्हणजे फक्त माझीच आई नव्हे; आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत असंच घडत असणार, हे नक्की. आजवर मराठी रंगभूमीवर किंवा एकंदर कलेच्या प्रत्येक विभागात आई आणि तिचे इतरांसोबतचे नातेसंबंध यावर भाष्य करणाऱ्या कलाकृती सादर झाल्या. पण एखादी लेखन स्पर्धा आयोजित केली जावी आणि त्यात येणाऱ्या कितीतरी संहितांमधून चाळण होत होत एक संहीता निवडली जावी, व त्याला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळून आज त्याचे ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला‘ नावाचे दर्जेदार मराठी नाटक व्हावे. ही घटना फार महत्त्वाची आहे, असं मला वाटतं.
इंदीरा नामक वयस्कर बाई मुंबईत चाळ पाडून आता नव्याने उभारलेल्या बिल्डिंगमधील एका २ बीएचके घरात राहतात. त्यांची मुलगी इरा लग्न होऊन आपल्या पती व मुलासोबत बदलापूरला राहते तर मोठा मुलगा अमेरिकेत स्थायिक आहे. इथे सोबत म्हणून त्यांनी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या निधीला पेइंगगेस्ट म्हणून ठेवलेले असते. मात्र आता इराच्या मुलाचे म्हणजेच ईशानचे मुंबईतील कॉलेजमध्ये ॲडमिशन झाल्याने तो तिथे राहायला येणार असतो. साहजिकच आजीचे घर म्हटल्यावर ईशान मुक्तपणे वावरत असतो. आपला तरूण मुलगा तिथे असताना इराला निधीची अडचण वाटू लागते. निधीचे इंदीरासोबतचे मनमोकळेपणाने वागणे, ईशानसोबतची मैत्री, घरातील स्वच्छंदी वावर इराला कायम खटकत असतो. त्यामुळे निधीला तिथून जायला सांगून ईशानसाठी एक स्वतंत्र खोली ‘आपल्या’ घरात व्हावी, हा सल्ला इरा आईला देते. मुलीच्या आग्रहाखातर इंदीरा निधीला स्वतःची सोय दुसरीकडे बघायला सांगते. इरा मात्र हटवादी वृत्तीची असल्याने काहीही करून ती निधीला तिथून बाहेर काढते. मग काही काळाने स्वतःची बदली आईच्या घराजवळच्या शाखेत करून घेत परस्पर नवरा नितीन सोबत थेट इंदीराच्याच घरी राहायला येते. इतकी वर्षे मुलांविना राहिलेल्या इंदीरावर आता मात्र जबाबदाऱ्या वाढू लागतात.
इराचे आईला गृहीत धरणे दिवसेंदिवस वाढतच जाते, ज्याचा त्रास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे इंदीराला होत असतो. स्वतःच्या मनाप्रमाणे आईचे जगणे ठरवणाऱ्या इराला आईची होणारी कोंडी दिसत नसते. ह्या सगळ्यात जावई नितीन मात्र सासूबाईना शक्य तितकी मदत करत असतो. इराच्या वागण्याचा त्रास होत असूनही इंदीरामधील ‘आई’ आपल्या मुलीसाठी म्हणून तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत राहते. तिकडे दुसरीकडे कधीतरीच फोन करून ख्यालीखुशाली विचारणारा मुलगा आईला अमेरिकेत येण्यास सांगत असतो. पण इथल्या एकटेपणाला कंटाळलेली इंदीरा तिथल्या अधिकच्या भयाण एकांताला सामोरे जाण्यास तयार नसते. इथे इरा आपल्या सासूबाईना बदलापूरच्या घरी सोबत व्हावी म्हणून आईलाच तिथे जाऊन राहण्याचा प्रस्ताव देते. सदैव आपल्या मुलांसाठीच जगलेल्या इंदीरावर स्वतःचे घर सोडून जाण्याची वेळ येताच निधी तिला भानावर आणते आणि तिचे हरवत चाललेले जगणे शोधायला मदत करते. कथेच्या ओघात अशा घटना घडत जातात कि शेवटी इंदीरा धीर करून एका निर्णयाशी येऊन ठेपते. सतत मुलांसाठीच जगणारी इंदीरा शेवटी नेमकं काय करते? इराच्या वागण्याचा तिला कसा त्रास होतो ? निधी इंदीराच्या आयुष्यात काय बदल करते ? हे सर्व पाहायला मिळते ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ ह्या नाटकाच्या प्रयोगामध्ये.
लेखिका स्वरा मोकाशी ह्यांनी या नाटकात सर्व व्यक्तीरेखांना विविध छटा दिल्या आहेत. आई-मुलीचे नाते दाखवताना जावई नितीनचा समजूतदार स्वभाव, ईशानचा अल्लडपणा, आणि निधीचा बिंधास्त ॲटीट्यूड अधोरेखित होत राहतो. त्यामुळेच हे कोणा एकाच्या कलाने चालणारे नाटक न वाटता सर्व व्यक्तीरेखा अपेक्षेप्रमाणे समोर येतात. वेळोवेळी प्रसंगानुरूप इंदीराच्या तोंडी येणाऱ्या म्हणी अगदी चपखलपणे आल्या आहेत. आईला गृहीत धरून वागणाऱ्या इरा ह्या व्यक्तीरेखेला सरधोपट नकारात्मक न करता तिच्या स्वभावविशेषांमध्ये लेखिकेने व्यक्तीरेखा घडवली आहे. इंदीराला सुद्धा अगदीच सोशिक आईचे रूप न दिल्याने तिच्यातील भावभावनांच्या विविध छटा स्पष्टपणे समोर येतात.
‘आईने मुलांवर संस्कार करायचे असतात; त्यांचे संसार करायचे नसतात’ किंवा ‘त्यागालाच सर्वस्व मानणाऱ्या काळात आमचा जन्म झालाय’ अशा आशयाची अनेक वाक्ये नाटकात इंदीराच्या तोंडी येतात. खरंच नाटक पाहताना त्यातील प्रत्येक पात्रात आपल्या कुटुंबातील कोणीतरी दिसत राहते. साध्या सोप्या भाषेत एक महत्त्वपूर्ण विषय हाताळला गेला आहे आणि एक ‘अनाहूत’ नातं नाटकातून मांडलं आहे. आपल्या आयुष्यात आई बरंच काही करते आणि तिचे कष्ट, त्याग अनमोल आहे. नाटक पाहताना किंबहुना इंदीराला पाहताना हसू येते, तिचे कौतुकही वाटते, कधीकधी तिच्याकडे बघून वाईटही वाटते व डोळ्यांच्या कडा नकळतपणे पाणावल्या जातात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत हा ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ नक्कीच पाहावा…
नाटक : हरवलेल्या पत्त्यांचा बंगला
लेखिका : स्वरा मोकाशी
दिग्दर्शक : चंद्रकांत कुलकर्णी
नेपथ्य : प्रदिप मुळ्ये
प्रकाशयोजना : रवि – रसिक
संगीत : अशोक पत्की
निर्माते : जिगीषा, श्रीपाद पद्माकर आणि दिलीप जाधव
सहनिर्माती : राणी वर्मा
कलाकार : प्रतिक्षा लोणकर, दिप्ती लेले, राजन जोशी, अथर्व नाकती आणि वंदना गुप्ते
Source : https://www.rangabhoomi.com/