महाराष्ट्रात 15 जिल्ह्यांत अजूनही कोरोना रुग्णसंख्या वाढती आहे. रत्नागिरीमध्ये दररोज अंदाजे 400 रुग्ण सापडत आहेत. मृत्यूदरही जास्त आहे. यामुळे राज्य शासनाने होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेतला. परंतु सध्या रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नाहीत, पुरेसे डॉक्टर, प्रशिक्षित नर्स, कर्मचारी नाहीत. त्यामुळे होम आयसोलेशनच्या निर्णयाचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेरविचार करावा, अशी मागणी भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केली आहे.
यासंदर्भात अनिकेत पटवर्धन म्हणाले, होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय चुकीचा आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात बेड उपलब्ध नाहीत. पुरेसे डॉक्टर, प्रशिक्षित नर्स, कर्मचारी नाहीत. कोरोनाच्या दुसर्या लाटेत रत्नागिरीमध्ये मृत्यूदर वाढला आहे. परंतु अनेकांना कोणतीही लक्षणे नाहीत, परंतु ते बाधित असल्याने आणि फारशी लक्षणे नाहीत, घरी राहून बरे होऊ शकतात त्यांना होम आयसोलेशनचा पर्याय दिला होता. त्यात रुग्ण घरच्या वातावरणात बरेही झाले आहेत.
आता रत्नागिरी जिल्ह्यात ही सोय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने नुकसानच होणार आहे. कारण ज्यांना ताप, अंगदुखी, अशक्तपणा किंवा अन्य कोणतीही लक्षणे नाहीत त्यांनाही रुग्णालयात दाखल व्हावे लागेल. परंतु रुग्णालयांत आधीच जास्त लक्षणे किंवा गंभीर रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे. मग लक्षणे नसणार्या रुग्णांनी कोठे जावे? अशी स्थिती होणार आहे, असे स्पष्ट मत अनिकेत पटवर्धन यांनी व्यक्त केले. राज्य शासनाने जाहीर केलेल्या रेड झोनमधील जिल्ह्यांत रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. होम आयसोलेशन बंद होणार आहे. परंतु पॉझिटिव्ह रेट 20 टक्केच्या वर गेल्यास रेड झोन होतो, असा निकष आहे. रत्नागिरीचा पॉझिटिव्ह रेट 17.43 टक्के आहे. त्यामुळे जिल्हा रेड झोनमध्ये का गेला याची तपासणी करणे आवश्यक असल्याचे मत अनिकेत पटवर्धन यांनी व्यक्त केले.