(मानसिक संतुलन – भाग ९)
अस्मितेचा सरळ अर्थ आहे ‘अहंकार’. कसला अहंकार मीपणाचा अहंकार! पतंजली ऋषी म्हणतात “यदा द्रष्टु: स्वरुपेऽवस्थानम्” एखादे स्वच्छ स्फटिक, ज्या रंगाच्या फुलावर ठेवला असता त्या फुलाचा रंग धारण करतो. लाल फुलावर तो लाल दिसतो. तर निळ्या रंगाच्या फुलावर ठेवल्यास तो निळा दिसतो. त्याप्रमाणे कोणताही रंग रूप नसलेला द्रष्टा (आपला चैतन्यात्मा) ज्या देहावर पडेल त्याची अवस्था तो घेईल. वास्तविक त्या दोन्ही गोष्टी भिन्न असूनही त्या एकरुप भासतात. काहीसे आपलेही असेच झाले आहे.
मी नेमका कोण हे शोधण्याऐवजी ज्यास मी अनुभवतो त्यासच मी सत्य मानून जगत राहतो. मी कोण शिंदे, मी पाटील, मी अमुक मी तमुक असे जीवनभर स्वतःला समजतो. शेवटी अनेक आडनावांच्या ह्या माणसांची एकाच स्मशानभूमीत राख होते. तेव्हा हे वेगळेपण नाहीसे होते. ह्या मी पणाला योगशास्त्रात अस्मिता हा शब्द आहे. अस्मिता हा दुसरा क्लेश, की जो आपली आत्मिक उन्नती रोखतो. नसलेली दुखे निर्माण करतो. निराशेच्या. खाईत लोटतो. म्हणून तो शत्रू ठरतो.
मी कोण याचा शोध कसा घ्यायचा? लहान मुलांच्या योग शिबिरात याचे उत्तर मिळते. एखाद्या मुलाला उभे करावे. त्याला त्याचे नाव विचारावे. तो आपले नाव सांगतो. सूरज त्याचे नाव. “किती वर्षे तू सूरज आहेस?” दुसरा प्रश्न. १५ वर्षे; त्याचे वय तो सांगतो. त्याचे वय १५ वर्षे आहे असे तो म्हणाला. तिसरा प्रश्न – “तू जन्मापासून सूरज आहेस का?” …. स्तब्धता ! उत्तर – ” नाही! मी जन्मापासून सूरज नाही. १२ व्या दिवशी मला पाळण्यात घातले. तेव्हा माझे नामकरण झाले.” याचा अर्थ त्यावेळी तुझे नाव सुरेश ठेवले असते तरी चालले असते. आता तू सुरेश म्हणून ओळखला गेला असतास. मुलांना हा मुद्दा पटतो. आपण कुठून आलो कुठे जाणार? ह्या सारख्या प्रश्नांच्या बुचकळ्यात मुले क्षणभर पडतात.
यावरून स्पष्ट होते की नावाचा आणि आपला तसा काहीच संबंध नाही. तरीही अज्ञानपणे त्यासाठी किती भानगडी होतात. हाणामाराऱ्याही होतात. नाव चैतन्यास चिकटणे हीच अस्मिता. स्वतःस काहीतरी समजणे म्हणजे अस्मिता. यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. आपण स्वतःस काही विशिष्ट समजत असू तर अनेक ठिकाणी आपला अपमान होतो. “कुणी विचारले नाही, कुणी पाणी दिले नाही, बसायला साधी खुर्चीही नाही. केवढा अपमान! अहंकार जितका अधिक तितका अपमान अधिक; तेवढे दुःख अधिक!
बिस्मिल्ला खाँ म्हणजे सनयी वादनाचे बादशाह! परंतु अहंकाराचा त्यांच्यात लवलेशही नव्हता. सनयी वादनाला आंतरराष्ट्रीय कीर्ती देणारे ते पहिलेच! असे उतुंग व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तीचे राहणीमान अगदी साधे होते. पांढरा सदरा आणि कुर्ता हा त्यांचा पेहराव. ‘जगाने कौतुक केल्यावर आपणही कौतुक करावे’ ही आपल्या भारतीयांची खासियत आहे. जगात त्यांच्या सनयी वादनाचा गाजावाजा झाल्यावर त्या भागातील लोकांनी त्यांचे कौतुक करायचे ठरवले.
आपल्या भागातील आपला माणूस, म्हणून काही उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांचा जाहीर सत्कार करण्याचे ठरविले. एक शानदार मोठा शामियाना उभारला. लहानथोर कामाला लागले. एका मोठ्या मोकळ्या मैदानात मंडप सजला. खां साहेबांना आमंत्रण गेले. साहेब वेळेवर पोहचले. परंतु तिथे कुणीच दिसेना. मोठी माणसे नेहमी १-२ तास उशिरा येतात असे गृहीत धरून कार्यकर्तेही तिथे अजून पोहचले नव्हते. बरे, तिथे कुणाला विचारावे तर ते गावपातळीवर त्यांना कुणी ओळखणारे ही नव्हते. शेवटी मंडपात तरी जाऊन बसावे म्हणून दरवाजातून ते आत जाऊ लागले. तोच एका माणसाने त्यांस वर खाली पाहिले आणि हटकले. ” तुम्ही आत जाऊ शकत नाही, तुमच्याकडे पास आहे का?”
“नाही मला काही पास दिला नाही,” अगदी साळसूदपणे ते म्हणाले. मग तुम्हाला आत जाता येणार नाही. तिकडे जाऊन बसा.” समोरच्या झाडाकडे बोट दाखवत तो म्हणाला. खां साहेबही तोंडातून चक्कार शब्द न काढता किंवा स्वतःची ओळख न सांगता दाखवलेल्या झाडाखाली जावून बसले. व मनातल्या मनात नवीन सुर जुळवण्यात दंग झाले. इकडे वेळ टळून गेल्यावर कार्यकर्ती मंडळी घाईघाईने तिथे आली. लोक जमले परंतु खां साहेब कसे अजून आले नाहीत, म्हणून शोधाशोध सुरू झाली. तेवढयात कुणालातरी सत्कार मूर्ती दूर असलेल्या झाडाच्या सावलीत एका दगडावर बसलेले दिसली. तशी एकच धावपळ उडाली. त्यांना बोलावून आणले. क्षमा मागितली. द्वारपालला ओरडा बसला. संयोजक परत परत माफी मागू लागले. या सर्वांची खां साहेबांना मोठीच गम्मत वाटली. त्यांचे एकच म्हणणे होते. ‘ संयोजकांनी त्यांना पास का दिला नाही’. त्या बिचाऱ्या द्वारपालची काय चूक. अजिबात कुणाला न रागवता अगदी शांतपणे त्यांनी कार्यक्रम केला व आपल्याच मस्तीत ते निघून गेले. यास म्हणतात अस्मिता लोप पावलेला माणूस! सर्व थोर व्यक्ती आणि साधुसंत स्वतःस ईश्वराचा सेवक मानीत. हे सारे ईश्वराचे आहे, आपण फक्त निमित्त!
आता ह्या सर्वांचा मानसिक संतुलनाशी काय संबंध? संबंध आहे. कुठेना कुठे लिप्त (attach) होण्याची आणि दुःख ओढवून घ्यायची मनाला एक वाईट खोड असते. आपल्या भोवताली असणाऱ्या सजीव निर्जीव व्यक्ती – वस्तूंना तो आपले मानतो. निव्वळ मानीत नाही तर त्यावर मालकी हक्कही दाखवतो. व अपेक्षा करतो. ही मालकी व अपेक्षा त्याच्या नात्यातून, पैशातून किंवा त्याकडे असलेल्या विशेष गुणांतून निर्माण झालेली असते. स्वतःस त्यामुळे तो स्वतःच विशेष दर्जा देतो. आणि त्याच समजुतीत सर्व व्यवहार करीत राहतो. परंतु पुढे शेरास सव्वाशेर कुणीतरी भेटतोच. किंवा शेवटी वाढते वय त्यास भानावर आणते. त्या धक्क्याने त्याच्या वाट्याला निराशा येते.
नम्रता हा मनुष्याचा सर्वात मोठा गुण आहे. नम्र माणूस सदा सुखी असतो. दुसऱ्यांना मोठेपणा देणे हा त्याचा खास स्वभाव असतो. त्यामुळे तो शरीर आणि मनाने सदैव मोकळा राहतो. अशा माणसास मानसिक तणाव फार कमी येतो. आला तरी तो टिकून राहत नाही. नम्र वृत्ती असल्याने तो सर्व भार ईश्र्वरावर टाकतो. श्रद्धाळू माणूस सहसा आत्महत्या करीत नाही. त्याच्यासाठी सुखदुःखे समान असतात. कुणाकडून तो कोणतीही अपेक्षा करीत नाही. त्यामुळे कुणी फसवण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. मात्र प्रतिष्ठेची खोटी झुल पांघरून जगणाऱ्यांचे कधीना कधी पितळ हे उघडे पडतेच. त्यावेळी तोंड लपवायला जागा उरत नाही.
काही लोक हा प्रकार जाणूनबुजून करतात. परंतु बऱ्याच लोकांना आपण जे समजतोय, वागतोय हे चुकीचे आहे याचीच कल्पना नसते. मग ते त्यांचे अज्ञान म्हणा किंवा त्यात त्यांना वाटत असलेला आनंद म्हणा. कसेही असले तरी याचा शेवट दु:खातच होतो. कोणत्याही गोष्टीचा अहंकार फार काळ टिकत नाही. ऐन तारुण्यात मोठ्या पदावर कार्यरत असलेलेल्या साहेबाला रिटायर्ड झाल्यावर कुणीही विचारत नाही. त्यावेळी येणारी निराशा ही अस्मिता जोपासल्याचाच परिणाम असतो.
अहंकाराला इंग्रजीत ego असा शब्द आहे. कधी कधी अति नम्रतेचाही माणसास अहंकार होतो. त्यास “Ego of egolessness” असे गमतीने म्हटले जाते. टीळे माळे लावलेले आधुनिक साधुसंत अनेक धर्मस्थळी उद्धटपणे वागतांना दिसतात. त्यांचा पेहराव फक्त साधूचा असतो. वृत्ती अहंकाराची असते. हे साधू समान्यांपेक्षाही खूप दुखी आणि निराश झालेले असतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. कोणत्याही प्रसंगाचा नम्रपणे स्वीकार करणे हेच योगाचे मोठे तत्व आहे. मी कुणी मोठा नाही, माझ्या ताकदीला, बुद्धीला, विचारांना, कल्पक शक्तीला मर्यादा आहेत हे नम्रपणे स्वीकारून वाटचाल केल्यास कोणताही प्रसंग भावनिक आघात करीत नाही. अस्मितेची ही झुल जेवढी कमी कमी होत जाईल तितका शरीरात आणि मनात हलकेपणा येऊन जगण्याची एक नवी उमेद निर्माण होत जाते.
– दिनेश पेडणेकर, योग शिक्षक (मंडणगड)
मोबाईल 9420167413