(क्रीडा)
श्रीलंका आणि भारत संघांत तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी पार पडला. या सामन्यात श्रीलंका संघाने भारतावर १६ धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. या विजयात कर्णधार दासुन शनाकाने महत्वाची भूमिका बजावली. त्याने आपल्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर दोन मोठे विक्रम केले.
श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने भारताविरुद्धच्या दुस-या टी-२० सामन्यात दमदार फलंदाजी केली. त्याने २२ चेंडूत २ चौकार आणि ६ षटकारांसह ५६ धावांची नाबाद खेळी खेळली. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या शनाकाने अवघ्या २० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या शानदार खेळीच्या जोरावर श्रीलंकेने निर्धारित २० षटकांत ६ बाद २०६ धावा केल्या. एकवेळ श्रीलंकेचा संघ ६ विकेटवर १३८ धावा करून संघर्ष करत होता. शनाकाने करुणारत्नेसोबत सातव्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. प्रत्युत्तरात भारतीय संघाला ८ बाद १९० धावाच करता आल्या.
शनाकाने आपल्या झंझावाती अर्धशतकाद्वारे दोन मोठे विक्रम केले. तो श्रीलंकेसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने माजी दिग्गज फलंदाज महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांना मागे टाकले आहे, ज्यांनी आतापर्यंत श्रीलंकेसाठी सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम केला आहे. जयवर्धने आणि संगकाराने २१-२१ चेंडूत अर्धशतक झळकवले होते. जयवर्धनेने २००७ मध्ये जोहान्सबर्गमध्ये केनियाविरुद्ध, तर २००९ मध्ये संगकाराने नागपुरात भारताविरुद्ध ही कामगिरी केली होती.