राज्यात सध्या कठोर निर्बंध लागू असून १ जूननंतर लॉकडाउन कायम राहणार की उठवला जाणार यावरुन सध्या चर्चा रंगली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसल्यानंतर ठाकरे सरकारने आणलेल्या निर्बधांमध्ये दुकानांचाही समावेश आहे. दुकानं सुरु ठेवण्यासाठी सरकारने सकाळी ७ ते ११ ची वेळ दिली आहे. मात्र ही सूट फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकानांनाच आहे. दरम्यान लॉकडाउन उठवला नाही तर १ जूननंतर दुकानं सुरु करणार असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
“कोणत्याही परिस्थितीत लॉकडाउन शिथील करण्याची गरज असून आम्ही लॉकडाउनचं पालन करणार नाही असं औरंगाबादची जनता सांगत आहे. त्यांच्या बोलण्यातही लॉजिक आहे. कारण दोन महिन्यांपूर्वी शहराचा आकडा १८०० वर गेला होता, पण आज आपण १२० वर आलो आहोत. ग्रामीण भागात २०० च्या आसपास आलो आहोत. लोकांनी इतकं सहकार्य दिलं, इतकं कष्ट सहन करुन आकडेवारी कमी केली. आता पुन्हा पंतप्रधान, मुख्यमंत्री टीव्हीवर येऊन आम्हाला ज्ञान पाजळणार असतील तर कोणीही कोणाचं ऐकणार नाही. मग पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मी सांगो…लोक १ तारखेनंतर ऐकणार नाहीत,” असं इम्तियाज जलील यांनी सांगितलं आहे.