भारतीय जनता पक्षाचे नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे नेते, राज्याचे उच्चशिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची गुप्त भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार होताना दिसून येत आहे. या दोघांमध्ये गुप्त भेट झाल्याचा दावा भाजपचे नेते निलेश राणे यांनी केला व सर्वांच्या भुवया उंचावल्या. यासंदर्भात उदय सामंत यांनी हे वृत्त फेटाळून लावले असून रत्नागिरी येथे तौक्ते चक्रीवादळाच्या दौऱ्यादरम्यान 2 मिनिटांची सदिच्छा भेट झाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. निलेश राणे यांच्या या दाव्यामुळे राजकिय वातावरण ढवळून निघाले होते. मात्र सामंत यांनी खुलासा करुन राणे यांचा दावा चुकीचा ठरविला आहे. त्यामुळे या चर्चेला पुर्णविराम लागल्याचे बघायला मिळाले आहे.
उदय सामंत म्हणाले की, भाजपचे पदाधिकारी निलेश राणे यांनी ही भेट गुप्त असल्याचं एका व्हिडीओद्वारे प्रसिद्ध केला आहे. मात्र ही कोणतीची गुप्त भेट नव्हती तर उघडपणे सर्वांसमोर सदिच्छा भेट झाली. यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. असा खुलासा सामंत यांनी केला आहे.माजी खासदार निलेश राणे यांनी सामंत-फडणवीस भेट झाल्याचा गौप्यस्फोट केला होता, यासंदर्भात ते म्हणाले होते की, ‘तोक्ते चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती सिंधुदुर्गात असतानाही पालकमंत्री उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी खास रत्नागिरीत गेले होते. या दोघांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली,’
तौक्ते वादळात नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा सोडून उदय सामंत यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची भेट घेण्यासाठी तातडीने रत्नागिरीत येण्याचं नेमकं कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.