(मुंबई)
शिवम मावीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पहिल्या टी-२० सामन्यात भारताने दोन धावांनी विजय मिळवला. पदार्पणाच्या सामन्यात शिवम मावीने ४ बळी घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. वानखेडे मैदानावर झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने श्रीलंकेवर २ धावांनी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजीकरत श्रीलंकेला १६३ धावांचे टार्गेट दिले होते. पदार्पणाच्या सामन्यात ४ विकेट घेणारा शिवम मावी भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताने दिलेल्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ २० षटकांत १६० धावांपर्यंत पोहोचला. शिवम मावीने चार तर उमरान मलिक आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले.
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. १२ धावांवर त्यांना पहिला धक्का बसला. सलामी फलंदाज निसांका अवघ्या एका धावांवर बाद झाला. त्यानंतर २४ धावांवर दुसरी विकेट गेली तर ५१ धावांत श्रीलंकेचे ४ फलंदाज तंबूत परतले. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंका संघाचे ठराविक अंतरावर विकेट पडत गेल्या. श्रीलंकेकडून कर्णधार दसुन शनाकाने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. त्याशिवाय वानंदु हसरंगा २१, चामिरा करुनारत्ने २३ तर कुसर मेंडिसने २८ धावांची खेळी केली. पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.
तत्पूर्वी, श्रीलंकन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतालाही सुरुवातीला धक्क्यावर धक्के बसले. सलामीवीर शूभमन गिल ७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर फॉर्मात असणा-या सूर्यकुमार यादव याला चामिरा करुणारत्ने याने तंबूचा रस्ता दाखवला. संजू सॅमसनलाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. संजू ५ धावा काढून परतला. इशान किशन आणि हार्दिक पांड्याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण इशान किशन आणि हार्दिक एकापाठोपाठ एक बाद झाल्यानंतर भारताच्या अडचणी वाढल्या. अखेर दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांनी डाव सावरत भारताला सन्माजनक धावसंख्या उभारून दिली.
दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांच्या खेळीच्या बळावर भारताने निर्धारित २० षटकांत १६२ धावांपर्यंत मजल मारली होती. सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन आणि शुभमन गिल यांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांनी मोक्याच्या क्षणी भारताची धावसंख्या वाढवली. दीपक हुड्डाने २३ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. तर अक्षर पटेलने २० चेंडूत ३१ धावांची खेळी केली. इशान किशनने २९ चेंडूत ३७ धावांची खेळी केली, तर हार्दिक पांड्याने २७ चेंडूत २९ धावांची खेळी केली. वानिन्दु हसरंगा, चामिका करुणारत्ने, महेश तिक्षणा आणि दिलशान मदुशंका यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.