( इक्बाल जमादार / खेड )
सध्या वाहनांनी पेट घेण्याच्या घटना राज्यात वाढताना दिसताहेत. रविवारी रात्रीही खेडमधील मोरवंडेनजीक चालत्या कारने पेट घेतल्याने गोंधळ उडाला. सुदैवाने कार चालकाने प्रसंगावधान राखल्याने पाच जण बचावले आहेत. काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय त्यांना दिसून आला.
सविस्तर वृत्त असे की, स्विफ्ट कार चालक मिलिंद दत्ताराम मिरगल हे आपल्या ताब्यातील स्विफ्ट कार घेवून गुहागर येथून मुंबईच्या दिशेने जात होते. यावेळी मुंबई गोवा महामार्गावरील मोरवांडे येथे आले असता अचानक कारने पेट घेतला. कारमधून ज्वाळा उसळताना कार कार चालकाने पहिल्या. त्याबरोबर त्याने कारमधील इतर लोकांना सावध केले. त्याने लगेचच रस्त्याच्या कडेला आपल्या ताब्यातील कार थांबवली. इतरांना एका बाजूने बाहेर पडण्यास सांगितले. लागलीच पाचहीजण बाहेर पडले. त्यामुळे सारे बचावले. गाडीतून उतरताच खेड येथील नगर परिषदेला याबाबत माहिती कळवून अग्निशमक बंबाची मागणी केली. नगर परिषदेने तातडीने अग्निशमन बंब घटनास्थळी पाचारण केला. तोपर्यंत कारने मोठा पेट घेतल्याने कार जळून खाक झाली होती. कारमधील सर्व सामान जळून खाक झाले होते. मात्र अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने अनर्थ टळला.
या कारमधील मिलिंद मिरगल यांच्यासह स्वप्नाली मिलिंद मिरगल, योगिता रूपेश मिरगल, सुनंदा दत्ताराम मिरगल, सविता अंकुश मिरगल असे बाचवलेल्याची नावे आहेत.